• Sat. Jun 6th, 2026
    …तर महायुती काठावर थांबणार! ठाकरे बंधूंना सत्तेची किती संधी? काँटे की टक्कर दाखवणारी आकडेवारी

    मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असून, ९ वर्षांनंतर झालेल्या या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामच्या एक्झिट पोलनुसार भाजप-शिंदेसेना महायुतीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होईल. तब्बल ९ वर्षांनी मुंबई महापालिकेसाठी मतदान झालं. या निवडणुकीत कोणाला बहुमत मिळणार, याबद्दल उत्सुकता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई आहे. त्यामुळे उद्याच्या मतमोजणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मतदान संपताच काही एक्झिट पोल्स समोर आले. सामच्या एक्झिट पोलनुसार भाजप-शिंदेसेना यांच्या महायुतीला बहुमताचा आकडा गाठण्यात यश मिळू शकेल.

    सामच्या एक्झिट पोलमधील आकडेवारीनुसार ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती सत्तेपासून दूर राहताना दिसत आहे. मुंबईत महापालिकेच्या एकूण २२७ जागा आहेत. बहुमतासाठी ११४ जागांचा आकडा गाठण्याची गरज आहे. सामच्या एक्झिट पोलनुसार ठाकरेसेनेला ६५, मनसेला १० आणि शरद पवारांच्या पक्षाला २ जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ही आघाडी ७७ पर्यंत जाते. काँग्रेस आणि वंचितला २३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. ठाकरे बंधू, राष्ट्रवादी शप आणि काँग्रेस-वंचित सोबत आल्यास १०० चा आकडा होतो.
    Maharashtra TimesThane Exit Poll 2026: शिंदे सुस्साट! आनंद दिघेंनाही जमलं नाही, ते करुन दाखवणार; रेकॉर्डब्रेक जागा जिंकण्याचा अंदाज
    दुसरीकडे भाजपला ८४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिंदेसेनेला ३५ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन्ही पक्षांचा आकडा ११९ पर्यंत पोहोचतो. असाच निकाल लागल्यास महायुतीकडे काठावरचं बहुमत असेल. महायुतीचा आकडा आणखी थोडा खाली आल्यास ठाकरे बंधूंची युती आणि काँग्रेस-वंचित आघाडीला एकत्र येऊन सत्तेची संधी असेल.
    Maharashtra TimesBMC Election Exit Poll: मुंबईत कोणाची सरशी? ठाकरे बंधू की महायुती? पहिला एक्झिट पोल समोर, बहुमत कोणाला?
    २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी शिवसेना एकसंध होती. त्यावेळी पक्षाला ८४ जागा मिळाल्या होत्या. तर भाजप ८२ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. शिवसेनेनं मुंबईत सत्ता स्थापन केली होती. पण आता ९ वर्षांत परिस्थिती बदलली दिसते. शिवसेनेत फूट पडल्यानं ठाकरेंच्या पक्षाची ताकद घटली आहे. त्यांनी राज ठाकरेंच्या मनसे सोबत युती केली आहे. त्यांच्या युतीला ६५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. गेल्या निवडणुकीत मनसेला ७ जागा मिळाल्या होत्या. यातील ६ नगरसेवकांनी पुढे शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ ९० च्या घरात गेलं होतं.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा