उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलं आहे. अजित पवार यांना अनेकदा उपमुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. याबाबत अजित पवार यांनी आजच्या प्रचारसभेत खंत व्यक्त केली.
“इथल्या महानगरपालिकेत चहाचा मींदा देखील नाही, आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर कर्ज आहे. 9 हजार कोटींचे बजेट असताना कर्ज का काढलं? मी अनेकांना उमेदवारी देऊन नगरसेवक केलं. काहींच्याबाबत माझे मीठ अळणी निघालं. मला आता पश्चाताप होतोय. काय होतास तू, काय झालास? भंगार गाड्या इकडून तिकडे घेऊन जायचा”, असा टोला अजित पवार यांनी भाजप आमदार महेश लांडगे यांना लगावला.
“महानगरपालिकेला लुटणाऱ्यांना उमेदवारी दिली नाही. टँकर माफिया असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली नाही. नऊ वर्षात इथं भ्रष्टाचाराचा राक्षस उभा राहिला. त्याला आपल्याला हटवायचं आहे. अन्यथा तुमच्या पुढील पिढीचं काही खरं नाही. भंगारवाल्यांचं काय व्हीजन असणार आहे? यांना आता मी काय बोलू”, असं म्हणज अजित पवार यांनी डीपी प्लॅनवरून आमदार महेश लांडगे यांना टोला लगावला.
अजित पवार मुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हणाले?
“बस आणि मेट्रो प्रवास मोफत होणार. या निर्णयाला कॅबिनेटची मान्यता लागत नाही. सहा वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलं आहे. मुख्यमंत्री हा तोंडात शब्द येतोय. पण होत नाही. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद असेल तर नक्की होईल. सध्या काकांच्या पुण्याईने लई चांगलं चाललं आहे”, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
“घर बांधायला टिकाव मारला की आकाच्या धमक्या येत आहेत. सिमेंट आमच्याकडून घ्या, विटा आम्ही सांगू तिथून घ्या अशी धमकी देतायत. पण हवा बदलली आहे. सभेला परवानगी देऊ नये म्हणून दमदाटी केली. पहाटे पाचला सभेला परवानगी दिली. बिबटे येतायत. जुन्नरचे बिबटे पिंपरी-चिंचवडमध्ये येतायत, तुमच्या घरातील आई-बहिणीला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजता काम करायला सांगा”, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
“माझं नाणं खणखणीत आहे. माझं काम बोलतं, कुणाच्या बापाचा मींदा नाही. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कार्यकर्त्यांना त्रास दिला तर, हा अजित पवार हा डाव घालून फिरवून फेकून देईल की, पवारांची अवलाद सांगणार नाही. यांनाच काय डाव माहिती का? मी गेले बारा वर्षे झालं. महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष आहे”, असं अजित पवार ठासून म्हणाले.
“काही उमेदवारांना फॉर्म काढून घेण्यासाठी दमबाजी केली. सगळे लांडगे एका माळेचे मणी नसतात. एखादाच आंबा नासका असतो. त्याला वेळीच काढलं नाही तर सगळी नासवतो. आता 15 तारखेला त्या नासक्या आंब्याला बाजूला करा”, अशी खोचक टीका अजित पवार यांनी केली.
