उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लंडमनमध्ये जीव का अडकला आहे? असा सवाल केला.
“काही लोकांना निवडणूक आली की फक्त मराठी माणसाची आठवण येते. एरव्ही ही लोकं मराठी माणसाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. त्यांना मराठीसाठी काही करावसं वाटलंही नाही. दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेवढा पॉलिटिक्स एवढाच त्यांचा इंटरेस्ट आहे. म्हणून पाच वर्ष घरात आणि निवडणूक आली की मुंबईत धोक्यात असल्याचा दावा केला जातो. अरे मुंबई का रेल्वेचा डबा आहे? कुठेही काढला आणि कुठेही जोडला असं होत नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“तुम्हीच सांगता ना, मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आहे. पालिकेत तुमची 25 वर्षे सत्ता होती. मग हे कुणाचं अपयश होतं? सत्तेत असताना मराठी माणसासाठी आणि मुंबईसाठी काय केलं? सत्तेसाठी मराठी माणसाची शेवटची लढाई आहे, असं भावनिक भाषण काही लोकांनी केलं. पण मराठी माणसाचं अस्तित्व कधीच धोक्यात नव्हतं. उद्याही कधीच धोक्यात राहणार नाही. तुमचं राजकारण धोक्याचं आहे”, असा दावा एकनाथ शिंदेंनी केला.
“अरे एकनाथ शिंदे काय मराठी नाही? देवेंद्र फडणवीस मराठी नाहीत का? मुंबईतील मराठी माणसाचं महत्त्व कमी होणार नाही. त्यासाठी मुंबईचा येणारा महापौर मराठी असेल आणि महायुतीचा असेल. खरंतर यांच्यामुळेच मराठी माणूस मुंबईबाहेर गेला. तुमच्यामुळे गेला. मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांला पुन्हा सन्माने मुंबईत आणल्याशिवाय महायुतीचं सरकार राहणार नाही. मुंबईकरांना रोजगार, मुलभूत सोयी-सुविधा देणं हेच आमचं मिशन आहे”, असं शिंदे म्हणाले.
“मागे पहलगाममध्ये हल्ला झाला. त्यामध्ये आपले हिंदू बांधव मारले गेले. मराठी माणसंही होती. मराठी आया-बहिणींचं कुंकू फुसले गेले. तेव्हा हे लंडनच्या थंड हवेत थंड बसले होते. या हल्ल्यानंतर या देशाचे पंतप्रधान दौरा अर्धवट सोडून परतले. पण ह्यांनी लंडन सोडलं नाही. अरे काय एवढा जीव त्या ठिकाणी अडकलाय? असं काय आहे तिथे? काय आहे? घबाड आहे? जाऊद्या. माझ्याकडे सगळी माहिती. पण मी त्या खोलात जाऊ इच्छित नाही”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला.
“जे लोक मराठी माणसाच्या नावाने गळे काढतात ते निवडणूक संपल्यावर कुठे जातात हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना मराठी माणसांशी काही घेणंदेणं नाही. आता म्हणतात महाराष्ट्रासाठी आमचा वाद मोठा नाही. मग 20 वर्षे तुमच्यासाठी महाराष्ट्र छोटा होता? बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली नाही. त्यावेळी बाळासाहेबांपेक्षा तुमचा अहंकार मोठा होता. तुमचा स्वार्थ मोठा होता”, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला.
