• Sun. Mar 8th, 2026

    धर्मस्वातंत्र्य, सहिष्णुता आणि मानवतेचे कालातीत प्रतीक : गुरु तेग बहादूर साहिब – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 12, 2026
    धर्मस्वातंत्र्य, सहिष्णुता आणि मानवतेचे कालातीत प्रतीक : गुरु तेग बहादूर साहिब – महासंवाद

    भारतीय इतिहासातील धर्मस्वातंत्र्य, सहिष्णुता आणि मानवतेच्या मूल्यांचा विचार केला, तर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे नाव अत्यंत गौरवाने घेतले जाते. शीख परंपरेतील नववे गुरु असलेल्या गुरु तेग बहादूर साहिब यांचा जन्म एप्रिल १६२१ मध्ये अमृतसर येथे झाला. मूळ नाव त्याग मल असलेल्या गुरुजींनी लहान वयातच शौर्य, वैराग्य आणि आध्यात्मिक प्रगल्भतेचा परिचय दिला. एका युद्धातील अतुलनीय पराक्रमामुळे त्यांना ‘तेग बहादूर’—अर्थात तळपती तलवार—ही उपाधी प्राप्त झाली. १६६४ मध्ये ते शीख गुरु पदावर विराजमान झाले. त्यांनी आसामपासून काश्मीरपर्यंत कार्य करत सत्य, करुणा, संयम आणि निर्भयतेचा संदेश दिला. त्यांच्या ११६ पद्यांचा समावेश आजही गुरु ग्रंथ साहिबमध्ये असून, मानवतेचा आवाज म्हणून ती गुरुवाणी काळाच्या पलीकडे उभी आहे.

    ३५० व्या शहिदी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने ‘हिंद दी चादर’ हा राज्यस्तरीय उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा उद्देश गुरु तेग बहादूर साहिब यांचे जीवन, विचार आणि बलिदान केवळ धार्मिक चौकटीत न ठेवता सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय प्रेरणा म्हणून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. धर्मस्वातंत्र्य, सहिष्णुता, विविधतेतील एकात्मता आणि मानवतेचा आदर ही मूल्ये आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हाच या उपक्रमाचा गाभा आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात सिख समाजासह गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ऐतिहासिक कर्तुत्वाचे साक्षीदार आणि गुरु ग्रंथ साहिब मध्ये संदर्भ असलेल्या सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकि, भगत नामदेव व उदासीन समाज-संप्रदाय यांचा सहभाग असणार आहे. शासनाच्या या पुढाकारामुळे इतिहासातील हा तेजस्वी अध्याय केवळ स्मरणापुरता न राहता समाजमनात रुजवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

    या उपक्रमांतर्गत राज्यभर विविध स्वरूपाचे कार्यक्रम राबविले जात आहेत. गुरु तेग बहादूर साहिब यांच्या स्मृती जपण्यासाठी विशेष टपाल तिकीट आणि विशेष नाणे जारी करण्यात आले असून, यामुळे त्यांचे विचार घराघरात पोहोचतील. त्या काळातील ऐतिहासिक शस्त्रे, दस्तऐवज आणि सांस्कृतिक वारसा मांडणारी प्रदर्शने आयोजित करण्यात येत असून, त्यातून इतिहासाचा जिवंत अनुभव मिळतो आहे. तसेच शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि विविध समाजघटकांच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम, चर्चा, संगोष्टी आणि सांस्कृतिक सादरीकरणे राबवली जात आहेत. या माध्यमातून गुरु तेग बहादूर साहिब यांचे तत्त्वज्ञान केवळ ऐकण्यापुरते न राहता समजून घेण्याची संधी निर्माण होत आहे.

    या उपक्रमाची सुरुवात नागपूर येथील भव्य कार्यक्रमाने झाली. ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूरमध्ये पार पडलेल्या या राज्यस्तरीय कार्यक्रमाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती आणि विविध समाजघटकांचा सक्रिय सहभाग यामुळे हा कार्यक्रम केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरला. शिस्तबद्ध उपस्थिती, श्रद्धेचा भाव आणि इतिहासाबद्दलची जाणीव यामुळे नागपूरचा कार्यक्रम ‘हिंद दी चादर’ उपक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

    यानंतर नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य स्वरूपात कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंह यांची कर्मभूमी असलेल्या नांदेडमध्ये होणारा हा कार्यक्रम ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात गुरुवाणी, सांस्कृतिक सादरीकरण, विचारमंथन आणि सामाजिक एकात्मतेचे उपक्रम राबवले जाणार आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील भाविक, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.

    त्यानंतर नवी मुंबई येथे १८ आणि १९ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई महानगर परिसरातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध समाजघटकांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम गुरु तेग बहादूर साहिब यांच्या विचारांचा व्यापक प्रभाव अधोरेखित करणारा ठरेल. गुरुवाणी, कीर्तन, सामाजिक समरसतेचे उपक्रम, लंगर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे मांडला जाणार आहे.

    या सर्व उपक्रमांचा एकत्रित परिणाम असा होणार आहे की, गुरु तेग बहादूर साहिब यांचा इतिहास पुस्तकांच्या पानांपुरता मर्यादित न राहता सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडला जाईल. शालेय विद्यार्थ्यांपासून तरुणांपर्यंत, समाजातील विविध घटकांपर्यंत त्यांचे बलिदान, विचार आणि मूल्ये पोहोचतील. महाराष्ट्र शासनाच्या या प्रयत्नांमुळे गुरु तेग बहादूर साहिब हे केवळ शीख समाजाचे गुरु न राहता, संपूर्ण भारतीय समाजासाठी धर्मस्वातंत्र्य, सहिष्णुता आणि मानवतेचे कालातीत प्रतीक म्हणून नव्या पिढीच्या मनात स्थान मिळवतील. हीच त्यांच्या महान बलिदानाला खरी आदरांजली ठरेल.

    0000

    -सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed