Chief Minister Devendra Fadnavis Speech in Nashik : ’आम्ही केवळ ‘ब्लू प्रिंट’ दाखवणारे नाही, तर प्रत्यक्ष काम करणारे लोक आहोत. 15 तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या (मतदान करा), पुढची 5 वर्षे आम्ही तुमची काळजी घेऊ’.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात नाशिकसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला. ‘मी नाशिक दत्तक घेतले होते आणि मी तक्रार केली नाही. कोविड काळात जेव्हा सगळे घरी बसले होते, तेव्हा तुमचा हा ‘देवाभाऊ’ रस्त्यावर उतरून काम करत होता,’ असं म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ‘नाशिकमध्ये 57 हजार कोटींची गुंतवणूक आणली असून, एचएलआरची 12 हजार कोटींची गुंतवणूक लवकरच येत आहे. 10 हजार कोटींचा रिंग रोड, विमानतळ विस्तारासाठी 1200 कोटी आणि शहर गुन्हेगार मुक्त करण्यासाठी 4 हजार AI कॅमेरे बसवणार आहे. रस्ते वारंवार खोदावे लागू नयेत म्हणून फायबर ऑप्टिक आणि पाईपलाईनचे काम एकाचवेळी पूर्ण करणार असल्याची फडणवीसांनी जाहीर केलं.
‘राज ठाकरे तुम्हीच हा ठराव केलेला’, तपोवन वृक्षतोड वादावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा
‘गोदावरी इतकी स्वच्छ करू की…’
गोदावरी स्वच्छतेसाठी आम्ही 2500 कोटींची तरतूद केली आहे. कुणाला गंगेचं पाणी चालत नाही. मात्र, कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आम्ही गोदावरी नदी इतकी स्वच्छ करू की राज ठाकरे यांना येथे येऊन डुबकी मारता येईल’, असं म्हणत गोदावरी स्वच्छतेच्या ठाकरेंच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.
तपोवन आणि कुंभमेळ्यावरून विरोधकांना चपराक
तपोवन प्रकरणावरून अफवा पसरवणाऱ्यांना फडणवीसांनी गुगल फोटो दाखवत चोख प्रत्युत्तर दिले. तसेच ‘ज्यावेळी नाशिक महापालिकेत तुमची सत्ता होती. तुमचे महापौर होते. त्यावेळी त्याच 54 एकर जागेचा ठराव झाला’, असं म्हणत राज ठाकरेंच्या टीकेला प्रतिउत्तर दिलं. ‘तपोवनाची जागा खुलीच राहणार, त्याचा कोणताही कमर्शियल वापर होणार नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, कुंभमेळ्याच्या परंपरेवर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना ते म्हणाले की, ‘औरंगजेबालाही कुंभमेळा बंद करता आला नाही, तर तुम्ही काय करणार? कुंभमेळा ही आमची संस्कृती आहे आणि ती सुरूच राहील’.
Devendra Fadnavis यांचं नाशिकमध्ये ठाकरे बंधूंना सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले, ‘माझी खिल्ली उडवली, पण…’
‘लाडकी बहीण’ ते ‘लखपती दीदी’
महिला भगिनींना आश्वस्त करताना फडणवीस म्हणाले, ‘जोपर्यंत तुमचा हा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आता आमचे लक्ष्य केवळ पैसे देणे नाही, तर बहिणींना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे आहे. मी येथून पुढे नाशिकच्या आमदारांना रस्त्याबाबत माहिती विचारणार नाही, त्याची माहिती आमच्याकडे असते. आता विचारणार किती लाडक्या बहिणी लखपती दीदी झाल्या’.
