मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा तालुक्यातील केत्तूर येथील रहिवासी सुहास जाधव याने आपल्या सात वर्षांच्या जुळ्या मुला-मुलींना, शिवांश आणि श्रेया यांना हिंगणी येथील शेतातील विहिरीत ढकलून दिलं. या घटनेनंतर त्याने स्वतः घरी फोन करून घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीय आणि नातेवाईक तातडीने विहिरीकडे धावले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दोन्ही चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही मुलांना विहिरीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी सुहास जाधव मुलांचा जीव घेतल्यानंतर स्वतःही कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करत बार्शीच्या दिशेने पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवत त्याचा पाठलाग केला आणि त्याला ताब्यात घेतलं. सध्या सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सुहास जाधव हा झरे येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रात ऑपरेटर म्हणून नोकरीला होता. जाधव कुटुंबाकडे बागायत शेती असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
करमाळा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आरोपी सुहास जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका सुशिक्षित आणि जबाबदार पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने आपल्याच पोटच्या मुलांसोबत असा क्रूर व्यवहार केल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या घटनेने करमाळा तालुक्यातील केत्तूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शिवांश आणि श्रेया हे दोघेही केत्तूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होते. त्यांच्या अकाली मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.