भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंना मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे आता आगामी काळात ठाकरे बंधूंची चिंता वाढणार का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
“बारा महिने नालेसफाई करु, असं तुम्ही वचननाम्यात लिहित आहात. मग 25 वर्षे का नाही केली? उद्धव ठाकरे उत्तर देतील? 25 वर्षे नाल्यामध्ये जीव गुदमरुन लोकं गेली. मला दुर्दैवाने आणि दु:खाने असं म्हणावं लागत आहे, एक प्रथितयश डॉक्टर आमरापूरकर यांचा मॅनहॉलमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आता हे नालेसफाईच्या गोष्टी सांगत आहेत? घाटकोपरमध्ये एक भगिनी पावसाळ्याच दळण दळण्यासाठी निघाली आणि मॅनहॉलमध्ये पाय घसरला, तिचा मृतदेह समु्द्रात सापडला. आता हे वचननामा सांगत आहेत की आम्ही 12 महिने नालेसफाई करु? पहिले आम्हाला हा हिशोब द्या की आधी का नाही केलं?”, असं आशिष शेलार म्हणाले.
“700 फुटांच्या घरांना करातून सूट देऊ ही मागणी कुणाची आहे? माझा एक्सवर त्या मागणीचा व्हिडीओ आहे. महापालिकेत ज्यावेळेला 500 फुटांच्या घराच्या करमाफीचा विषय आला तेव्हा भाजपने 700 फुटांची मागणी केली. तेव्हा उद्धवजी तुमच्या पक्षाने विरोध केला. मी विधानसभेच्या सभागृहात तो प्रश्न मी उपस्थित केला. आता तो वचननामा देताय”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
“आता आम्ही तुमच्या भ्रष्टाचाराचा कारनामा काढणार आहोत. तुमच्या कारनामाचं पुस्तक काढणार आहोत. तुम्ही देवनारच्या डम्पिंग ग्राऊंडचा विषय काढताय, आजपर्यंत देवनारच्या डम्पिंग ग्राउंडबाबत कारवाई का सुरु केली नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर त्याला गती मिळाली. ते का केलं नाही? त्यांचा कारनामा आम्ही बाहेर काढणार आहोत”, असा मोठा इशारा त्यांनी दिला.
“हे लबाडाघरचं जेवण आहे. मनसे आणि उबाठा सेनेचे हा वचनननामा म्हणजे लबाडाघरचे जेवण आहे. लाडकी बहीण योजनेला कोर्टात जाईपर्यंत विरोध केला. आता ते दीड हजार रुपये देणार सांगत आहेत. त्यांचं म्हणण्यावर कुणाचा विश्वास नाही”, असा दावा आशिष शेलार यांनी केला.
“ठाकरेंना लोकशाही प्रक्रियेतील निवडणूक यंत्रणांचे नियम माहिती आहेत का? अहो निवडणूक प्रक्रिया ही कायद्याप्रमाणे चालते. निवडणूक आयोग चालवतो. तुमच्या घरगुती कलाहसारखं चालत नाही की, मामाकडे बसलं आणि सोडवला. मामाकडे बसून सोडवण्याचे प्रकार तुमच्याकडे आहे. निवडणूक आयोगाची प्रक्रिया आहे. अर्ज भरला जातो. अर्जाची छाननी होते. त्यानंतर अर्ज मागे घेतला जातो. या प्रक्रियेत कुणी अर्ज मागे घेतला तर तुमच्या पोटात का दुखत आहे? ह्यांनी पराभव मान्य केला आहे. प्रत्येक गोष्टीवर रडू बाई रडू असं चाललं आहे”, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली.
