Bhandup BEST Accident: मुंंबईतील भांडूपमध्ये 29 डिसेंबरला रात्री 9 च्या सुमारस एका बेस्ट बसने 14 जणांना चिरडले. यामध्ये मंगेश दुखंडे हे गंभीररित्या जखमी झाले होते. रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी अपघात कसा झाला हे सांगितले. तो भयानक क्षण आठवताना त्यांचे आश्रु अनावर झाले.
भांडुप येथे राहणाऱ्या दुखंडे यांचे कुटुंबीय गावी असतात. इथे ते एकटे राहतात. सोमवारी रात्री त्यांना रुग्णालयात आणले, त्यावेळी त्यांच्यासोबत गावातील नातेवाईक होते. दुखंडे यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. मिळेल ते काम करून ते चरितार्थ चालवतात. त्या अपघाताचा धक्का इतका जबरदस्त होता की, ते थरथर कापत होते. परिचारिकेने त्यांच्या अंगावर दोन ब्लँकेट घातली, तरी त्यांची थंडी कमी होत नव्हती. हातापायाला जखमा झाल्या होत्या. ओठ फाटले होते. त्यातून रक्त येत होते.
BEST Bus Accident: जखमींच्या यादीत नाव नाही, रुग्णालय पालथं घातलं; अपघात कक्षात जाताच… राजेशने आईपाठोपाठ भावालाही गमावलं
‘कामावरून घरी जाण्यासाठी बसच्या रांगेत उभा होतो. समोरून वेगाने बस आली. पुढे येऊन बस थांबली की, त्यात चढू, या तयारीत होतो. पण काय झाले, कळलेच नाही. बस थांबलीच नाही. मी कुठेतरी फेकला गेलो. बहुदा बसच्या खाली गेलो. बहुतेक चाकाखाली आलो नाही. डोळे उघडले, तर रुग्णालयामध्ये होतो. देवानेच मला वाचवले. हा माझा पुनर्जन्मच आहे हो…’ असे म्हणून दुखंडे ढसढसा रडायला लागले.
Bhandup Bus Accident: मानसीने 20 वर्षे रुग्णांची केली सेवा, वर्षा उद्याच रुजू होणार होती; पण भांडूपमधील ‘ती’ रात्र दोघींसाठी काळ ठरली
कोणी तरी त्यांचा पत्ता, फोन नंबर मागितला. तो देताना त्यांनी तीनदा वेगवेगळे क्रमांक सांगितले. त्यावरून त्यांच्या मनस्थितीची कल्पना येत होती. ‘मला एकटे राहू द्या,’ म्हणत त्यांनी डोळे मिटण्याचा प्रयत्न केला. पण डोळ्यांच्या कोपऱ्यांतून ओघळणाऱ्या अश्रृंनी त्यांच्या मनातील अस्वस्थता मूकपणे बोलून दाखवली.
