जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका इच्छुक महिला उमेदवाराच्या डोळ्यांत अश्रू आलेले बघायला मिळाले. उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी दिसताच इच्छुक महिला उमेदवाराला अश्रू अनावर झाले.
जळगाव महापालिका निवडणुकीत प्रभांग क्रमांक 10 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कलाबाई शिरसाठ या इच्छुक आहेत. इथे शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे. त्यामुळे हा प्रभाग ठाकरे गटाला सुटला आहे. इथे चारही उमेदवार हे ठाकरे गटाचे निश्चित झाले आहेत. पण या वॉर्डमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कलाबाई शिरसाट या इच्छुक आहेत. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा देखील प्रयत्न केला. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्या नाराज झाल्या.
अखेर आपल्याला पक्षाकडून उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर कलाबाई यांना रडू कोसळलं. यावेळी माध्यामांना प्रतिक्रिया देताना त्यांनी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांवर गंभीर आरोपही केले. तसेच आपण अपक्ष निवडणूक लढणार असल्याचंदेखील त्यांनी जाहीर केलं.
Pune News : पुण्याच्या राजकारणात भूकंप, रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला
कलाबाई शिरसाट काय-काय म्हणाल्या?
“मी राष्ट्रवादीची जुनी कार्यकर्ता आहे. गेल्या 15 वर्षांपासून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहे. मला पक्षाने तिकीट देणार असल्याचं सांगितलं होतं. पण काही बंडखोर लोकं आहेत, त्यांनी सांगितलं की, चारही जागांवर आमची युती झालेली आहे. उबाठा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची युती झाली आहे. मी तिकडे उमेदवारांची यादी चेक करण्यासाठी गेले तेव्हा ठाकरे गटाच्या चारही उमेदवारांची नावे टाकलेली बघायला मिळाली. त्यांच्या चारही उमेदवारांची नावे टाकली आहेत, मग मी का नाही? मग आम्ही गरीब असल्याने, मी हलक्या जातीची आहे म्हणून मला तुच्छतेने बघत आहे. कुलभूषण माझा फोन उचलत नाहीत. हा बंडखोरीपणा आहे की नाही?”, असा सवाल कलाबाई यांनी केला.
सर्वात मोठी बातमी! शरद पवारांकडून BMC निवडणुकीसाठी 7 उमेदवारांची यादी जाहीर, कुणाकुणाला संधी?
“मला आश्वासन मिळालं होतं की, तुमचं तिकीट फिक्स आहे. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी मला सांगितलं होतं. कुलभूषण यांनी सांगितलं की, युती होणार पण माझेच उमेदवार राहणार. तुझे चार उमेदवार म्हणजे इथे तुझाच न्याय चालेल का? हा माझ्यावर अन्याय झाला आहे”, असं कलाबाई म्हणाल्या.
“आमचे संतोष भाऊ येतील, त्यांच्याशी मी बोलणं करेन. पण माझ्यावर हा अन्याय झाला आहे. मी अपक्ष म्हणून उमेदवारी लढवणारच आहे. त्यासोबत आंदोलनही करणार आहे. मला आज खूप वाईट आहे. माझ्यासोबत उबाठासोबत काय शत्रूत्व आहे?”, असं म्हणत कलाबाई यांना रडू कोसळलं.
