छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या गोटात सध्या प्रचंड हालचाली सुरु आहेत. पण असं असलं तरी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचं जागावाटप ठरताना दिसत नाही.
महानगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी महायुती प्रयत्नशील आहे. या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश जागांवर सहमती झाली असली तरी, 7 जागांवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी प्रबळ दावा ठोकला आहे. सहा तास चाललेल्या चर्चेत स्थानिक नेत्यांनी आपापली बाजू मांडली. मात्र कोणताही पक्ष माघार घेण्यास तयार नसल्याने पेच कायम राहिला.
वरिष्ठ नेते घेणार अंतिम निर्णय
स्थानिक पातळीवर तोडगा निघत नसल्याचे पाहून, हे प्रकरण आता राज्याच्या नेतृत्वाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या 7 जागांबाबत अंतिम चर्चा करून जागावाटपाचे सूत्र निश्चित करतील. या निर्णयाकडे आता दोन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
इच्छुकांची वाढती संख्या आणि चुरस
महानगरपालिकेत वर्चस्व राखण्यासाठी दोन्ही पक्षांकडून ताकद लावली जात आहे. विशेषतः काही प्रभागांमध्ये दोन्ही बाजूंचे तगडे उमेदवार असल्याने हा तिढा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर दोन्ही पक्षांनी ऐनवेळी इतर पक्षातील आयात नेत्यांना मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश दिला आहे. एका वार्डामध्ये किमान 10 ते 12 इच्छुक असल्यामुळे बंडखोरी होण्याचा टेन्शन प्रत्येक पक्षाला आहे. वरिष्ठ पातळीवरून होणारा निर्णय महायुतीतील समन्वय राखण्यासाठी किती यशस्वी ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Raigad Crime : मंगेश काळोखे हत्या प्रकरणात पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, गाडीचा पाठलाग अन् 26 तासांत देवकर पिता-पुत्राला बेड्या
शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेच्या कोअर कमिटी बैठक पार पडली. ज्या प्रभागात डिस्पुट आहे त्या बाबतीत वरिष्ठांना यादी पाठवली आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे हे चर्चा करून निर्णय घेणार आहे. यावर अर्धा तासात सकारात्मक निर्णय येईल. त्यानंतर आम्ही पुढची भूमिका घेणार आहोत. आम्हाला युतीतच निवडणुका लढवायच्या आहे. त्यामुळे सकारात्मक प्रयत्न करत आहोत. या क्षणाला युती झाली नाही. तास-दीड तासात निर्णय होईल, असं पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले.
Raigad Crime : खोपोलीत नगरसेविकेच्या पतीचा खून, पीडित कुटुंबियांची भेट घेत एकनाथ शिंदे कडाडले, ‘मंगेशला संपवणाऱ्यांना…’
भाजपची भूमिका काय?
शिवसेना-भाजप युती संदर्भात बैठक झाली. दोन्ही बाजूने आपल्या प्रभागानुसार मांडणी केली. यावर सकारात्मक चर्चा झाली. अडचणीच्या असलेल्या काही प्रभागांची यादी तयार केली आहे. ती यादी वरिष्ठांकडे पाठवली आहे. थोड्याच वेळात निर्णय येईल, असं भाजप आमदार संजय केणेकर म्हणाले.
