पुण्यात मनसेमध्ये महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत नेत्यांमध्येच संभ्रम आहे का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यामागे कारणही तसंच आहे. कारण दोन दिवसात मनसेने तीन वेळा युटर्न घेतल्याचं बघायला मिळत आहे.
पुणे मनसेचा आता महाविकास आघाडीला जाहीर प्रस्ताव आहे. मनसेला महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. काँग्रेसचे नेते मात्र महाविकास आघाडी म्हणून फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट इतकंच असल्याचं जाहीरपणे बोलत आहेत. काँग्रेस अद्यापही मनसेला महाविकास आघाडीमध्ये स्वीकारण्यास तयार नाही, असं सध्या तरी चित्र आहे. दुसरीकडे भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये मनसे सहभागी झाल्यास भाजपला तगडी फाईट देऊ शकू, असं मनसे नेते बाबू वागस्कर आता म्हणत आहेत.
भाजपच्या विरोधात आम्ही चौघे लढलो तर अतिशय तगडी फाईट देऊ. आम्ही चौघे एकत्र लढलो तर भाजपला चाळीस ते साठ जागांपर्यंत आणून पोहचवू, असं मनसे नेते बाबू वागस्कर म्हणताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आज सकाळी मनसेकडून संपूर्ण राज्यभरात आघाडी होत असेल तरच सोबत येऊ, असं स्पष्टीकरण काँग्रेस सोबत येण्याबाबत दिलं होतं. मात्र आपल्याच स्पष्टीकरणावर मनसेने यु-टर्न घेतला असून आता महाविकास आघाडी सोबत जाण्याची इच्छा दर्शविली आहे.
सर्वात आधी मनसेची काय भूमिका होती?
याबाबत सर्वात आधी मनसे नेते हेमंत संभूस यांनी प्रतिक्रिया दिली होती. “सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी मूळ महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष एकत्र येत असतील, तर आम्ही मविआसोबत जायला तयार आहोत”, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी म्हटलं होतं. पण त्यांच्या प्रतिक्रियेनंतर महाविकास आघाडीची काल रात्री बैठक पार पडली होती. या बैठकीला ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी होते. पण मनसे नेते या बैठकीत नव्हते. तसेच मनसे नेते अजय शिंदे यांनी आज सकाळी वेगळी भूमिका मांडली होती. पुण्यात मनसे काँग्रेस सोबत जाण्यास इच्छुक नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.
अजय शिंदे काय म्हणाले होते?
“मनसे शिवसेनाची युती महाराष्ट्रासाठी झाली आहे. यात मुंबईत काँग्रेसचा समावेश नाही राष्ट्रवादी (शरद पवार) हा पक्ष मुंबईत किंवा पुण्यात बरोबर येण्यासाठी सकारात्मक आहे. त्याची बोलणी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुरू आहेत. मात्र अशी परिस्थिती काँग्रेसबाबत नाही. असे असताना पुण्यात काँग्रेस बरोबर आघाडीत जावे का? प्रश्न मनसे समोर आहे. हा प्रश्न असल्यामुळे काल झालेल्या बैठकीत मनसे सहभागी झाली नाही. मुळात एका शहरात विरोधात लढणाऱ्या पक्षाशी दुसऱ्या शहरात आघाडी करणे जनतेच्या पचनी पडेल का? याचा विचार शिवसेनेने केला पाहिजे. आघाडी असेल तर ती सर्व महाराष्ट्रासाठी असेल. तर ते योग्य होईल”, अशी भूमिका अजय शिंदे यांनी घेतली होती.
अखेर बाबू वागस्कर काय म्हणाले?
यानंतर आता मनसे नेते बाबू वागस्कर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “आमची आणि ठाकरे गटाची युती झालेली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा खूप मोठा करिष्मा आहे. त्यामुळे मुंबई महापालिका शंभर टक्के आमच्याकडे येईल, अशी आशा आम्हाला आहे. भाजपच्या विरोधात आम्ही आणि महाविकास आघाडीतील पक्ष असे आम्ही तीनही एकत्र लढलो तर अतिशय सकारात्मक निकाल महाराष्ट्रात येतील. पुणे शहरातच आम्ही सर्व चारही पक्ष एकत्र लढलो तर आम्ही भाजपला 40 ते 50 जागांवर आणू शकतो”, असं बाबू वागस्कर म्हणाले.
