Dharashiv Incident: विहिरीतील पाणबुडी काढताना क्रेनला उच्चदाब वीज वाहिन्यांचा स्पर्श झाल्याने धाराशिवमध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून गावात शोककळा पसरली आहे.
आज (शनिवार) दुपारी एकच्या सुमारास ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. केशेगाव येथील गणपती शिवाप्पा साखरे यांच्या शेतातील विहिरीवर दुरुस्तीचे काम सुरू होते. विहिरीतील बिघडलेली पाणबुडी (सबमर्सिबल मोटर) बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली होती. कष्टाळू हात कामाला लागले होते. मात्र, काळाने तिथेच दबा धरला होता. मोटर वर खेचताना क्रेनचा लोखंडी भाग अचानक वर उचलला गेला आणि दुर्दैवाने वरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत तारेला स्पर्श झाला.
काही कळायच्या आतच विजेचा प्रचंड लोळ खाली उतरला. विद्युत प्रवाहाचा इतका जबर धक्का बसला की, तिथे काम करणाऱ्या चौघांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. एका क्षणात हसते-खेळते जीव निपचित पडले. या घटनेत कासिम कोंडीबा फुलारी (वय ५४) आणि त्यांचा अवघ्या १६ वर्षांचा कोवळा मुलगा रतन कासिम फुलारी यांचा जागीच मृत्यू झाला.
Latur News: अन्नदात्याचा असा शेवट नको रे देवा! डोळ्यांदेखत शेतकऱ्याचे तुकडे; लातूरमधील घटनेने मन सुन्न
बापाच्या मदतीला आलेला रतन जगाचा निरोप घेऊन गेला. तर त्यांच्यासोबतच रामलिंग नागनाथ साखरे (वय ३०) आणि नागनाथ साखरे (वय ५५) या दोघांचाही या दुर्घटनेत करुण अंत झाला.
एकाच वेळी गावातील चार जणांचा असा तडफडून मृत्यू झाल्याने केशेगाववर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी जमलेल्या नातेवाईकांच्या आक्रोशाने उपस्थितांचे काळीज पिळवटून निघाले. “पाणी काढायला गेले, पण स्वतःचा जीव देऊन आले,” असे म्हणत ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा केला आहे. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा शेतीकामातील सुरक्षिततेचा आणि महावितरणच्या तारांच्या जाळ्याचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. अवघ्या १६ वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा असा अंत पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत.
