पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध कयास बांधले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या भेटीला आले आहेत. पानसरे हे पिंपरी-चिंचवडमधील शरद पवार यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काय कारण असेल? याबाबत चर्चा रंगलेल्या आहेत. विशेष म्हणजे काल आझम पानसरे यांचे चिरंजीव निहाल पानसरे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.
दुसरीकडे काल आझम पानसरेंच्या घरात शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवारांनी बैठक घेतली होती. तर भाचा झिशानच्या कार्यालयात दोन्ही राष्ट्रवादीची बैठक झाली होती. त्यामुळे आज अजित पवार दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र आणण्याच्या अनुषंगाने चर्चा करायला आलेत की मुलगा निहालनंतर आझम पानसरेंनाही स्वतःच्या पक्षात येण्याचं आमंत्रण द्यायला आलेत? याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आता याबाबतचा खुलासा स्वतः अजित पवार करतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
अजित पवार प्रतिक्रिया न देताच निघून गेले
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आझम पानसरे यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुमारे एक तास चर्चा केली. या भेटीनंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी कोणतीही प्रतिक्रिया न देता तेथून निघून गेले. यानंतर माध्यमांशी बोलताना आझम पानसरे यांनी, पुढील दोन दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, असा विश्वास व्यक्त केला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये शंभर टक्के सत्ता मिळेल, असा दावाही त्यांनी केला. मात्र, “आज अजित पवार माझ्या निवासस्थानी भेटीसाठी आले होते. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,” असेही पानसरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आपण स्वतः आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? या प्रश्नावर आझम पानसरे यांनी नकार दिला असून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
दोन्ही राष्ट्रवादींमध्ये चर्चा काय?
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांची आज शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांसोबत जागावाटपावर चर्चा झाली. यावेळी शरद पवारांच्या पक्षाकडून 60 ते 65 जागांची मागणी करण्यात आली. मात्र तेवढ्या जागा सोडण्यास अजित पवारांनी नकार दिला. अजित पवार जवळपास 125 ते 130 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवार गटाचा प्रस्ताव अमान्य असल्याची माहिती आहे. त्यानंतर आज पुन्हा रात्री जागा वाटपावर नेते एकत्र बसणार असल्याची माहिती आहे. प्रथमदर्शनी पाहता सध्या तरी अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षात जागा वाटपावरून संघर्ष बघायला मिळतोय. आधी चिन्ह आणि आता जागा वाटपावरून दोन्ही राष्ट्रवादीत नवा संघर्ष बघायला मिळतोय.
