भाजप आमदार देवयानी फरांदे या आज भावूक झाल्या. यावेळी त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आलेले बघायला मिळाले. देवयानी फरांदे यांच्या भावूक होण्यामागे आज भाजप पक्षात चार नेत्यांचे झालेले पक्षप्रवेश कारणीभूत आहेत. ठाकरे गटाच्या दोन माजी महापौर विनायक पांडे, यतिन वाघ, मनसे नेते दिनकर पाटील, त्यांचा मुलगा अमोल पाटील, माजी नगरसेविका लता पाटील, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे यांचा आज भाजपात प्रवेश झाला. त्यांच्या प्रवेशावर भाष्य करताना देवयानी फरांदे यांना अश्रू अनावर झाले.
“मला कुणी कोंडीत पकडत असेल, कुणाला पकडायचं असेल तर त्यांनी मला जरुर पकडावं. मी कशालाही घाबरत नाही. पण मला असं वाटतं की, माझ्या भूमिकेसोबत पक्षाचे जुने नेते उभे राहिले असते, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना आज वेगळा संदेश गेला असता”, असं मत देवयानी फरांदे यांनी मांडलं.
‘गिरीश महाजनांना चुकीचं ब्रीफ केलं’
“मी गिरीश महाजन यांच्यावर अजिबात नाराज नाही. त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं गेलेलं आहे. काही दलाल आणि काही जणांचा स्वार्थ, ज्यांना आपल्याच घरात काही तिकीट मिळावे या स्वार्थातून या सगळ्या विषयाचं राजकारण झालं आहे. मला या विषयावर अधिक बोलायचं नाही”, असं फरांदे म्हणाल्या.
“पक्षाच्या दृष्टीकोनाने प्रवेश होतो, पक्ष मोठा होता. पण पक्ष मोठा होत असताना निष्ठावंतांवर अन्याय व्हायला नको. एवढीच भूमिका मी मांडत होते. मी परत सांगते की, आलेल्यांचं मी स्वागत करते, पण वरिष्ठांकडे मी कार्यकर्त्यांची भूमिका निश्चितपणे पोहोचवेन. गिरीश महाजन यांनी मला सांगितलं आहे की, आज प्रवेश झालेला असला तरी उमेदवारी फायनल नाही. दलाल या विषयावर मला अधिक बोलायचं नाही”, असं त्या म्हणाल्या.
‘माझ्यावर अन्याय झाला असेल तरी…’
“भाजपच्या विचारधारेत आमची तिसरी-चौथी पिढी आहे. माझे सासरे 1990 मध्ये पक्षाचे अध्यक्ष होते. सुहास फरांदे यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. सहा वर्षे ते कानाकोपऱ्यात फिरले आहेत. अनेकवेळा माझ्यावर अन्याय झाला असेल पण मी कधीही जाहीरपणे भूमिका घेतली नाही. मला खूप वाईट वाटतंय की मला आज हे बोलायला लागत आहे. माझी भूमिका यासाठी होती की, मी या मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या डोळ्यांसमोर एक चित्र होतं, या मतदारसंघातून चारही प्रवेश आजचे झाले नसते तर भाजपचा विजय झाला असता, हा माझा विश्वास होता. मी कुणाच्या एकाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत नव्हते”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
“मी निवडणुकीत सक्रिय राहीन. पण पक्षाच्या वरिष्ठांनी या सगळ्या विषयांची दखल घेतली पाहिजे. नेत्यांचा बळी जात असेल तर वेगळी गोष्ट आहे. पण कार्यकर्त्यांचा बळी जात असेल तर ते संकेत कार्यकर्त्यांमध्ये चांगले जात नाहीत. मी काही संस्थानिक नाही की आमदार झालेली आहे. मी नगरसेविका म्हणून संघर्ष करत आमदार झाले आहे. मी आणि माझं कुटुंब 40 वर्षांपासून काम करत आहोत”, अशी भूमिका यावेळी देवयानी फरांदे यांनी मांडली.
