खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला पाठिशी घालण्याचा आरोप केला.
खासदार निंबाळकर यांनी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांना उद्देशून विचारले की, “पिटु गंगणे यांनी आणलेला ड्रग्ज तुमच्या मुलाने घेतलं असत आणि त्याला त्याच वेसन लागला असता तर तुम्ही सहन केला असता का? कोणता बाप हे सहन करेल?” त्यांनी पुढे म्हटले की, आमदार पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती आणि तुळजापूरची बदनामी होत आहे असे कारण दिले होते. यावर खासदार निंबाळकर यांनी प्रश्न केला की, “अशी दुटप्पी भूमिका ठेवू नका. पिटु गंगणे तुम्हाला ब्लॅकमेल करत आहे का? तुमचं काही अडकलाय का?” अशा शब्दांत त्यांनी आमदार पाटील यांच्यावर टीका केली.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मोबाईलमधून एक फोटो दाखवत पुन्हा एकदा तुळजापूरच्या बदनामीचा प्रश्न उपस्थित केला. निवडणुकीनंतर एका शेतात दारूची पार्टी करत असतानाचा हा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता.
अशा दारूच्या पार्ट्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तुळजापूरची बदनामी होत नाही का, असा संताप व्यक्त करत त्यांनी आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि पिटु गंगणे यांच्यावर निशाणा साधला. खासदार निंबाळकर यांनी म्हटले की, “तुम्ही शेण खाल्लं आणि तुम्हाला शेण का खाल्ले असे विचारले असता तुळजापूरची बदनामी का करतंय म्हणून आम्हाला विचारता.” या विधानातून त्यांनी तुळजापूरच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या कृतींवर टीका केली.
