Pune News: येवलेवाडी परिसरातील हॉटेल साई बालाजी लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पश्चिम बंगालमधील दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून, लॉज मालक रवी गौडा आणि कामगार सचिन काळे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडी सासवड रोडवर असलेल्या बोपदेव घाट परिसरात ‘हॉटेल साई बालाजी लॉजिंग’ नावाने एक लॉज आहे. या लॉजचा मालक रवी छोटे गौडा (वय 46) आणि तेथे काम करणारा सचिन प्रकाश काळे (वय 40) हे दोघे मिळून आर्थिक फायद्यासाठी परराज्यातील मुलींना या ठिकाणी वेश्याव्यवसायात ढकलत होते. बाहेरून हे ठिकाण सामान्य लॉज वाटत असले तरी, आतमध्ये मात्र हा अवैध धंदा जोरात सुरू होता.
कोंढवा पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलीस हवालदार अमोल हिरवे यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत या प्रकाराची पक्की माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे आणि सहाय्यक निरीक्षक अफरोज पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला लॉजवर पाठवले. आतमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच, दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने लॉजवर धाड टाकली.
दरम्यान, या छाप्यात पोलिसांनी दोन महिलांची सुखरूप सुटका केली आहे, ज्या मूळच्या पश्चिम बंगालच्या असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच मुख्य सूत्रधार लॉज मालक रवी गौडा आणि कामगार सचिन काळे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर ‘पिटा’ (PITA) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने आरोपींना 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
