Jalgaon Murder Case: जळगाव जिल्ह्यात एका विवाहित महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. या तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून संपवण्यात आलं. आरोपींनी त्याला महिलेचा नाद सोडण्यासाठी धमकी दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर सोनवणे हा निमखेडी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता. गेल्या चार वर्षांपासून त्याचे परिसरातील एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यामुळे घरात आणि परिसरात अनेकदा वाद झाले होते. सागरच्या नातेवाईकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कोणाचेही ऐकले नाही. याच महिलेच्या कारणावरून सागर सोनवणे आणि निमखेडी येथील रहिवासी अनिल नन्नवर यांच्यात वारंवार वाद होत होते.
या दोघांच्या वादातून अनिल नन्नवरे आणि संदीप बाविस्कर यांनी सागरला धमकावले होते. “महिलेचा नाद सोड, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी त्यांनी दिली होती. या धमकीनंतर काही तासांतच, रात्री 10 वाजण्याच्या सुमारास राम मंदिराच्या जवळ हा दुर्दैवी प्रकार घडला. आरोपींनी सागरवर धारदार आणि तीक्ष्ण हत्यारांनी सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरने जागीच प्राण सोडले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सागरचा भाऊ विशाल सोनवणे आणि इतर नातेवाईक घटनास्थळी धावले. रक्ताने माखलेल्या सागरला खाजगी वाहनाने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. यावेळी सागरच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात मोठा आक्रोश केला. जळगाव जिल्ह्यात अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत असून कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
