उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. अजित पवारांचा रोखठोकपणा आज विधानसभेतही बघायला मिळाला. भाकड जनावरांच्या अनुदानावर सुरु असलेल्या चर्चांदरम्यान त्यांनी एक रोखठोक वक्तव्य केलं.
“भाकड जनावरे पाळणे शेतकऱ्यांसाठी कठीण असले तरी महाराष्ट्र देशात सर्वाधिक अनुदान देतो. गोवंशाचे शेण, गोमूत्र शेतीसाठी उपयुक्त असल्याने गोवंशाच्या संगोपनासाठी सरकार संवेदनशील असून अधिक सुधारणा करण्याचा विचार सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भूमिका मांडली. “राज्यात एक कोटींपेक्षा अधिक शेतकरी असून प्रत्येकाकडे भाकड जनावरे आहेत. जर प्रत्येकाने जनावरे दाखवून निधी मागितला तर मोठा आर्थिक भार पडेल. त्यामुळे गोशाळांमार्फतच ही योजना राबवली जात आहे. बोगस गोरक्षकांच्या नावाखाली होणाऱ्या लुटमारीवर आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणेला विश्वासात घेऊन कठोर कारवाई केली जाईल”, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाकड गायीसाठी प्रतिदिन ५० रुपये
आमदार विजय वडेट्टीवार यांनी मात्र सरकारवर टीका करत भाकड जनावरांचा शेतकऱ्यांना थेट उपयोग होत नसल्याचे सांगितले. विक्रीवर निर्बंध घालण्यात येतात, पण पर्यायी उपाय दिले जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला. गोरक्षणाच्या नावाखाली काही जण शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. यावर उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे यांनी भाकड जनावरांबाबत सरकारची भूमिका संवेदनशील असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांकडील भाकड गायी संगोपनासाठी गोशाळेत ठेवण्यात येतात आणि या गायींच्या संगोपनासाठी गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी देशी गायींसाठी प्रतिदिन ५० रुपये अनुदान दिले जाते, अशी माहिती त्यांनी दिली. गोवंश बंदी कायदा लागू असून गाय-बैलांचे गोमूत्रही उपयोगात आणण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रुरता करणाऱ्यांवर कारवाई
दरम्यान, आमदार अमोल खताळ यांनी गोशाळांची संख्या वाढविण्याची मागणी केली. आमदार डॉ. संजय कुटे यांनी शेतकरी कधीच गायींना कोंबून नेत नाहीत, तर शेतकऱ्यांच्या नावाखाली गोतस्करच गैरप्रकार करतात, असा मुद्दा मांडला. यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी चुकीच्या पद्धतीने जनावरांवर अत्याचार करणाऱ्यांवरच कारवाई केली जाईल, असे सांगितले.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील गळनिंब येथे कथित गोरक्षकांच्या मारहाणीत एका मुलाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावर आमदार हेमंत ओगले यांनी न्यायाची मागणी केली. आमदार कैलास पाटील यांनी गायींसोबत म्हशींनाही अडविले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी याबाबत माहिती घेण्यात येईल, असे सांगितले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सभागृहाला दिली.
