• Fri. Sep 11th, 2026

विधिमंडळात मंजूर होणारे कायदे समाजाच्या हिताचे प्रतिनिधीत्व करतात – आमदार सुधीर मुनगंटीवार – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Dec 11, 2025
विधिमंडळात मंजूर होणारे कायदे समाजाच्या हिताचे प्रतिनिधीत्व करतात – आमदार सुधीर मुनगंटीवार – महासंवाद

नागपूर, दि. ११ : लोकशाहीत कायदे करण्याची कायदेमंडळाची प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे. सभागृहात मंजुरीसाठी सादर होणारे कायद्यांचे मसुदे सखोल अभ्यासानंतर सादर केले जातात. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आशा, आकांशा पूर्ण होण्याची काळजी या मसूद्यातून घेतली जाते. सखोल अभ्यास आणि चर्चेनंतर मसुद्याचे कायद्यात रुपांतर होते, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

विधानभवन येथे 51 व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘कायदे निर्मितीची प्रक्रिया व या प्रक्रियेतील दोन्ही सभागृहाचे अधिकार’ या विषयावर मार्गदर्शन करतांना श्री.मुनगंटीवार बोलत होते. यावेळी विधानमंडळाच्या सचिव मेघना तळेकर (सचिव-2), डॅा.विलास आठवले (सचिव-3), विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने उपस्थित होते. सुरुवातीस श्रीमती तळेकर यांनी श्री.मुनगंटीवार यांचा परिचय करुन दिला.

महाविद्यालयात असतांना 1988 मध्ये मी विद्यार्थी या नात्याने संसदीय अभ्यासवर्गात सहभागी झालो होतो. लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात बसण्याची आकांक्षा त्या वर्गातून माझ्या मनात निर्माण झाली होती. काही वर्षातच विधानसभा सदस्य होण्याची संधी मला प्राप्त झाली. अशीच संधी या वर्गात सहभागी विद्यार्थ्यांना मिळू शकते. त्यासाठी चांगला जनसंपर्क आणि त्यादृष्टीने प्रयत्न आवश्यक असतात, असे श्री.मुनगंटीवार म्हणाले.

कायदेमंडळात कायदे तयार केले जातात. आपल्याकडे दोन कायदेमंडळ आहेत. त्यात संसद व विधानमंडळाचा समावेश आहे. कायदे निर्मितीसाठी केंद्र आणि राज्याच्या विषयांची वेगवगेळी सूची आहे. काही विषय मध्यवर्ती सूचित सविष्ट असल्याने या विषयांवर केंद्रीय कायदेमंडळासह राज्याच्या कायदेमंडळाला देखील कायदे करता येतात.

कायद्याचा मसुदा सखोल अभ्यासानंतर केला जातो. मसुदा सभागृहासमोर सादर झाल्यानंतर त्यातील प्रत्येक शब्दांवर चर्चा केली जाते. काही सदस्य त्यातील कलमांवर तासनतास अभ्यासपूर्ण मते मांडतात. कायदेमंडळाने मसुदा मंजूर केल्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी राज्यपालांना सादर केला जातो. राज्यपालांच्या मंजुरीनंतर या मसुद्याचे कायद्यात रुपांतर होते, असे श्री.मुनगंटीवार म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील त्यांनी दिली.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed