Nashik Farmer Death: नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात 27 वर्षीय तरुण शेतकरी महिलेचा ब्लोअर मशीनमध्ये केस अडकून मृत्यू झाला. शेतात औषध फवारणी करताना मशीनमध्ये पाणी भरत असताना हा अपघात घडला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल, 7 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास नाशिकमधील कातरणी येथील शेतकरी महिला माधुरी दीपक सोनवणे (वय 27) आपल्या शेतात कांद्याला औषध फवारणीचे काम करत होती. शेतीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लोअर मशीनमध्ये पाणी भरण्यासाठी ती गेली होती. ब्लोअर मशीनच्या टाकीमध्ये पाणी भरत असताना, अचानक तिचे केस मशीनच्या आत ओढले गेले.
केस मशीनच्या पंख्यात अडकल्यामुळे क्षणातच माधुरीचे डोके मशीनच्या पंख्याकडे खेचले गेले. यामुळे तिच्या डोक्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर, माधुरीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, या तरुण शेतकरी महिलेच्या अकाली आणि दुर्दैवी मृत्यूमुळे येवला तालुक्यासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. शेतीकामादरम्यान झालेल्या या अपघाताने अनेकांना धक्का बसला आहे. ब्लोअर मशीनसारख्या उपकरणांचा वापर करताना अधिक खबरदारी घेण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.
