Pune Police: कर्नाटकातील खुनाचा आरोपी मधु याला पुण्यात पोलिसांनी अटक केली आहे. प्रवासात केलेली एक चूक त्याला महागात पडली असून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी त्याला कात्रज चौकातून ताब्यात घेतलं.
खुनानंतर आरोपी मधु हा मुंबईकडे पळ काढत होता. प्रवासादरम्यान बसमधील सहप्रवाशाचा मोबाइल घेऊन त्याने वडिलांशी संपर्क साधला आणि इथेच त्याचा गेम झाला. मधुचे आणि त्याच्या वडिलांच्या संभाषणाचे लोकेशन कर्नाटक पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर त्यांनी तत्काळ बस क्रमांक, ट्रॅव्हल एजन्सी व रूटची माहिती गोळा करत पुणे पोलिसांशी संपर्क साधला. चालकाला आरोपीवर बारीक नजर ठेवण्याच्या सूचना देत पोलीस पथक त्याच्या मागावर होते. त्यानंतर पुणे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना तयार ठेवले.
बस पुण्यात शिरताच कात्रज चौकात अंमलदार रवींद्र भोरडे यांच्यासह पथकाने बस रोखली आणि सीट क्रमांक 5 वर बसलेल्या मधुची ओळखून त्याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत मधु आणि मृत महिला मंजुळा यांच्यात एक लाख रुपयांच्या आर्थिक देणी-घेणीवरून वाद झाल्याचे स्पष्ट झाले. पैशासाठी सुरू असलेल्या वादातून संतापाच्या भरात मधुने मंजुळावर धारदार शस्त्राने वार करत तिचा जीव घेतल्याचे तपासात उघड झाले.
दरम्यान, अटक केल्यानंतर आरोपी मधुला भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलं. पुढील प्रक्रियेनंतर कर्नाटक पोलिसांनी शिवाजीनगर सत्र न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड मिळवत त्याला परत कर्नाटकात नेले. फक्त एका कॉलमुळे खुनातील आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने या फिल्मी स्टाईल कारवाईचं कौतुक केलं जात आहे.
