Amravati Crime: एका गावातील एका 6 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून शाळेच्या CCTV फुटेजमुळे उघडकीस आलेल्या या प्रकरणात पोलिसांनी 56 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव बंड येथील उर्दू जिल्हा परिषद शाळेच्या आवारात घडली. काल दुपारी सुमारे 2 वाजता आरोपीने शाळेच्या परिसरात चिमुरडीला एकांतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घरी परतल्यावर पीडित मुलीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला.
मुलीकडून घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय तात्काळ शाळेत पोहोचले आणि त्यांनी CCTV फुटेज तपासले. फुटेजमध्ये संशयित व्यक्तीची संशयास्पद हालचाल स्पष्टपणे दिसून आली. यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. चांदूर बाजार पोलिसांनी तक्रार मिळताच वेगाने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपीवर संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणेदार अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शिरजगाव बंड परिसरात मोठी खळबळ उडाली असून, गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलीची सुरक्षितता आणि मानसिक स्थिती लक्षात घेऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडली जात आहे. तसंच, शाळेतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही चर्चा सुरू आहे.
