Thane Roads Closed: ठाण्यात 7 डिसेंबर रोजी डांबरीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत मोठे बदल होणार आहेत. गायमुख, काजूपाडा आणि फाऊंटेन हॉटेल दरम्यानचे रस्ते बंद राहतील. मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक वळवली जाईल.
ठाण्यातील गायमुख, काजूपाडा आणि फाऊंटेन हॉटेलदरम्यान हे बदल केले जाणार आहेत. ठाणे शहर पोलिसांनी याबद्दलची माहिती आपल्या एक्स हँडलवर काल पोस्ट केली होती. कासरवडवली ट्रान्सपोर्ट सब-डिव्हिझनच्या हद्दीत डांबरीकरणाचे काम होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे 7 तारखेला वाहतूकीत मोठे बदल केले जाणार असल्याचे सांगितले आहे.
मुंबई पाठोपाठ नवी मुंबईतही भुयारी मार्ग! हाय कोर्टाची प्रस्तावाला अखेर मंजूरी; पाहा कुठून-कुठे असेल हा मार्ग?
कोणते मार्ग बंद असतील?
घोडबंदर रोडवरील मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक वळवण्यात येणार असून Y जंक्शन आणि कापूरबावडी जंक्शन बंद करण्यात येणार आहेत. मुंबई आणि ठाण्यावरून येणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोल प्लाझा, मानकोळी, अंजुरफाटा आणि नाशिक रोडच्या दिशेने वळवले जाणार आहे. किंवा, याशिवाय ही वाहने कापूरबावडी जंक्शनवरून काशेली आणि अंजुरफाट्यावरूनही प्रवास करू शकतात.
पर्यायी मार्ग कोणते?
मुंब्रा आणि कळवाच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी खारेगाव टोल प्लाझा बंद केला जाणार आहे. या वाहनांसाठी खारेगाव बे ब्रिज मार्गे खारेगाव टोल नाका, मानकोळी आणि अंजुरफाट्यावरून प्रवास करता येणार आहे. तसेच नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना मानकोळी नाक्यावर बंदी घालण्यात आली असून, त्यांनी अंजुरफाट्यावरूनच प्रवास करावा लागणार आहे.
हलक्या वाहनांसाठी, अधिसूचनेत असे म्हटले आहे की ठाण्याहून घोडबंदरकडे जाणारी हलकी वाहने घोडबंदर–ठाणे रस्त्यावरील गायमुख चौकी येथून चुकीच्या बाजूने पुढे जातील आणि नंतर फाऊंटन हॉटेलसमोरील कटमार्गे इच्छित स्थळी जातील.
डोंबिवलीत भाजप-शिंदे सेनेचा संघर्ष चिघळला; पक्षप्रवेशावरून आरोप-प्रत्यारोप, थेट भिडले
ठाणे स्थानकाबाहेरही बंदी
त्याचबरोबर, ठाणे स्टेशनजवळ वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोपरीच्या बाजूला स्टेशनजवळ वाहनांना ‘नो एंट्री’ आणि ‘नो पार्किंग’चे नियम लागू करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी याबद्दलचे नियमही काल जाहीर केले. ठाण्याच्या पूर्वेकडे सॅटीस ब्रिजचे काम सुरू असून हा मार्ग खूपच अरुंद झाला आहे. त्यात दुचाकी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी वाढते. त्यामुळे ठाणे पोलिसांनी रेल्वे स्थानकाजवळ वाहनांना प्रवेश आणि पार्किंग दोन्ही बंद केले आहे.
