Satara News: सातारा पोलीस दलातील हवालदार सचिन लावंड यांचं नुकतंच अल्पशा आजाराने निधन झालं. परंतु निधनापूर्वीच त्यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवर स्वतःच्या फोटोसह ठेवलेलं स्टेटस व्हायरल झाल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सचिन लावंड हे सातारा पोलीस मुख्यालयातून काही दिवसांपूर्वीच पुसेगाव पोलीस ठाण्यात बदली होऊन आले होते. नवीन ठिकाणी रुजू होऊन अवघ्या चार दिवसांतच ते आजारी रजेवर गेले होते. रजेवर असतानाच त्यांना काविळ झाल्याचं निदान झालं. काविळ संपूर्ण शरीरात पसरल्याने त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली होती आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
सचिन लावंड यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. विशेषतः त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवलेलं स्टेटस अनेकांसाठी धक्कादायक ठरला. त्यांनी स्वतःच्या फोटोसह ‘दि. ४ रोजी सकाळी ८ वाजता, दरुज येथे सावडण्याचा विधी आहे,’ असं स्टेटस ठेवलं होते. हे स्टेटस व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने चौकशी केली आणि त्यांच्या निधनाची दुर्दैवी बातमीची खात्री केली.
दरम्यान, सचिन लावंड यांच्या अकाली निधनाने त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस दलाने एक कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला आहे. लावंड यांच्या निधनामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
