Baramati Family Met Accident: तिरुपती बालाजीच्या दर्शनावरुन परत येत असताना कुटुंबाला अपघात झाला. या अपघातात बारामतीच्या दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे, तर त्यांची दोन्ही मुलं जखमी झाल्याची माहिती आहे.
बारामती येथील श्रायबर डायनामिक्स डेअरी इंडस्ट्रिजमध्ये कार्यरत असलेले अनिल सदाशिव जगताप (वय 50) आणि त्यांची पत्नी वैशाली अनिल जगताप (वय 45) अशी मृत दांपत्याची नावं आहेत. तर, त्यांचा मुलगा अथर्व (वय 24) आणि मुलगी अक्षता (वय 20) हे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जगताप कुटुंब शनिवारी (29 नोव्हेंबर) बारामतीहून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते बुधवारी (3 डिसेंबर) पहाटे साडेचार वाजता परतत असताना कर्नाटकातील हुबळी राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती आहे. पुढे जाणाऱ्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावता आणि जगताप यांचे चारचाकी वाहन मागून त्या ट्रकला जाऊन जोरदार धडकलं आणि गाडीचा चक्काचूर झाला.
Pune Accident : हिंजवडी आयटी पार्कमध्ये तीन सख्ख्या भावंडांना चिरडलं, मायबापाचं विश्व उद्ध्वस्त, मद्यधुंद बस चालकाला पादचाऱ्यांचा चोप
या अपघातात अनिल जगताप यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पत्नी वैशाली जगताप गंभीर जखमी होत्या. त्यांना तातडीने हुबळी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. अपघातात त्यांची दोन्ही मुलं जखमी झाली असून, सध्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच गाडीमध्ये त्यांच्या नातेवाईकांचा एक लहान मुलगाही होता, सुदैवाने त्यालाही फारशी दुखापत झाली नाही. या दुर्दैवी घटनेनंतर बारामती शहरातील शिवाजीनगर परिसरात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अनिल जगताप व वैशाली जगताप हे दांपत्य अत्यंत मनमिळावू होते. त्यांच्या अकाली जाण्याने बारामतीतील त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला. दरम्यान गुरुवारी (4 डिसेंबर) सकाळी बारामतीत या दांपत्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांनी दिली आहे.
