मुक्ताईनगरच्या मतदान केंद्रावर आज संध्याकाळच्या सुमारास मोठा राडा झाला. भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळी आमनेसामने आलेले बघायला मिळाले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती निवाळली.
शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप भाजपच्या एका कार्यकर्त्याने केला आहे. यावेळी मोठा गोंधळ उडाला. या घटनेनंतर आता भाजपच्या खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या संबंधित मतदान केंद्रावर दाखल झाल्या. यावेळी मतदान केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठी संख्या बघायला मिळाली.
नेमकं काय घडलं?
मुक्ताईनगरमध्ये आज सकाळपासून बोगस मतदान केलं जात असल्याचा आरोप केला जात होता. या आरोपांवरुन प्रचंड राजकारण आज सकाळपासून तापताना बघायला मिळत आहे. असं असताना आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास एक भाजप कार्यकर्ता मतदान करायला आला. यावेळी या भाजप कार्यकर्त्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी दोन्ही बाजूने संघर्ष बघायला मिळाला. प्रचंड मोठा गोंधळ या ठिकाणी झाला. यावेळी पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. घटनेच्या पार्श्वभूमीवर तातडीने पोलिसांना मोठा फौजफाटा मतदान केंद्राबाहेर दाखल झाला. पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रापासून दूर करण्यात आलं. यानंतर भाजपच्या संबंधित कार्यकर्त्याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
सर्वात मोठी बातमी, आदित्य ठाकरे यांनी थेट नावे सांगितली, मतदारयाद्यांबाबत काय-काय म्हणाले?
भाजपचा पदाधिकारी काय म्हणाला?
“समोरचा व्यक्ती शंभरवेळा इकडे येत आहे. पोलिसांना धमकी देत आहेत. समोरचे आमदार आले. आमदारांसोबत बोलत असताना मला मारहाण झाली. मी भाजपचा अल्पसंख्याक मोर्चाचा प्रदेश सदस्य आहे. आमदार चंद्रकांत पाटील साडेतीन वाजता मतदान केंद्रावर आले. ते आतमध्ये आल्यानंतर आम्ही रक्षाताई खडसे यांच्याकडे तक्रार केली. माझ्याकडे व्हिडीओ आहे. सीसीटीव्ही कॅमेरा चालू आहे”, अशी प्रतिक्रिया भाजप पदाधिकाऱ्याने दिली.
“विषय असा आहे की, हा माझा सख्खा भाऊ आहे. तो भाजपचा कार्यकर्ता आहे. तो शेवटचं मतदान करत होता. त्यावेळी चंदू भाऊ तिकडून येत असताना शिवसैनिकांना आरडाओरड केली. मी त्यांना थांबायला सांगितलं. त्यावेळी आमदार आले. आमदार माझ्याशी बोलत असताना तिकडून त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मला ओढत होते. माझे कपडे फाडले. हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत की गुंड आहेत? शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. ज्या व्यक्तीने मला मारहाण केली त्याला अटक करावी. मी त्या व्यक्तीला ओळखतो”, असा दावा संबंधित भाजप पदाधिकाऱ्याने केला.
