• Sat. Mar 7th, 2026
    दुर्दैवी! भलामोठा लोखंडी गेट अंगावर कोसळला; 5 वर्षीय चिमुकल्याचा करुण अंत, वडिलांच्या कुशीत सोडला जीव

    Nashik News: अयनिश सचिन गवई असं मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेनं गवई कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

    nashik gate collapsed(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, जुने नाशिक: मुंबई नाका परिसरात इमारतीचे नादुरुस्त लोखंडी प्रवेशद्वार अंगावर पडल्याने पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    काय घडलं नेमकं?
    मुंबई नाका परिसरातील गायकवाड नगरमधील कृष्णा रेसिडेन्सी इमारतीत राहणारा अयनिश सचिन गवई (वय ५, मूळगाव मालासूर, तालुका परतूर, जिल्हा अकोला) हा शुक्रवारी ( दि. २८) दुपारी एकच्या सुमारास इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळत होता. यावेळी तो इमारतीच्या लोखंड प्रवेशद्वारावर चढला असता ते त्याच्या अंगावर कोसळले. यामुळे अयनिशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. वडील सचिन गवई यांनी त्वरित त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वाटेतच लेकराने जीव सोडला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेनं कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला.
    Maharashtra TimesNashik Accident: करोनात पतीचं निधन, पदरात 5 लेकरं, पण आईने हिंमत नाही हारली, एक चूक अन् सारं काही संपलं
    तर दुसरीकडे, जेलरोडच्या शिवाजीनगर चौकात अवजड डम्परच्या मागील चाकाखाली सापडून पायी जाणारे सेवानिवृत्त प्रेस कामगार अशोक केरू धोंगडे (६०, हरिसागर रो हाऊस, जयभवानी रोड) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धोंगडे तीन महिन्यांपूर्वीच आयएसपी प्रेसमधून निवृत्त झाले होते.
    Maharashtra TimesNashik News: कुटुंबकलहातून घडलं भयंकर, दोन्ही लेकरांचे हात घट्ट पकडून पित्याने आयुष्य संपवलं, नाशकात खळबळ
    शुक्रवारी (दि. २८) दुपारी एकच्या सुमारास जेलरोडच्या शिवाजीनगर चौकातून रस्त्याने पायी जात असताना बिटकोकडून खडी वाहतूक करणारा डम्पर (एमएच १५, जेसी ३५२९) आला. शिवाजीनगर येथून तो उपनगर, नारायणबापू चौकाच्या दिशेने वळाला. क्लिनर बाजूकडील पाठीमागच्या चाकाखाली धोंगडे सापडल्याने ते जागीच ठार झाले. उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन डम्परसह चालकला ताब्यात घेतले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा