• Fri. Mar 6th, 2026
    आधी पक्षांतराचे संकेत, आता थेट शिंदेंच्या व्यासपीठावर; मातब्बर नेता ‘घड्याळ’ सोडणार?

    फलटण नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली. मुलाच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर रामराजेंनी थेट धनुष्यबाण चिन्हावर पॅनल उभे केले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    – सुधीर पाटील

    सातारा: नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने फलटणमध्ये मोठी राजकीय घडामोडी झाली आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट) विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेच्या व्यासपीठावर दिसले. निवडणूक जाहीरनाम्याच्या प्रकाशनानंतर दोघांनी एकमेकांचा हात उंचावला. त्यामुळे रामराजे राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाणार का?, अशी चर्चा सुरु झाली आहे.

    रामराजेंचे पुत्र अनिकेतराजे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. ते फलटणच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. अनिकेतराजेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पॅनेल रिंगणात आहे. फलटण तालुक्यात रामराजे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर तसेच मंत्री जयकुमार गोरे यांच्यात विळ्या भोपळ्याचे सख्ख्य आहे. रामराजेंनी आपल्या मुलाला नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरवताच रणजितसिंह निंबाळकरांनी आपले भाऊ समशेरसिंह यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे फलटण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
    Maharashtra Times‘लव्ह मॅरेज आहे का? सासर माहेर…’; अजितदादांचा महिला उमेदवाराला थेट प्रश्न, भाषणात एकनाथ शिंदेंचा उल्लेख नाही, चर्चांना उधाण
    विधानसभा निवडणुकीत फलटणची जागा राष्ट्रवादीची असल्याने महायुतीच्या फॉर्म्युलानुसार ती अजित पवार गटाला सोडण्यात आली. त्याचवेळी रणजितसिंह निंबाळकरांनी राजकीय खेळी करून त्यांचे कट्टर समर्थक सचिन कांबळे-पाटील यांना राष्ट्रवादीत पाठवले. अजितदादांनी त्यांना उमेदवारीही दिली. पक्षाचे विधान परिषद आमदार असूनही रामराजे निवडणूक काळात तटस्थ होते. रामराजेंचे चुलत बंधू संजीवराजे आणि तत्कालीन आमदार दीपक चव्हाण हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा दीपक चव्हाण यांनाच उमेदवारी दिली. महायुतीचे सचिन कांबळे पाटील यांनी दीपक चव्हाण यांचा पराभव केला.
    Maharashtra TimesRatnagiri News : भास्कर राव, आपला उमेदवार असताना कुणाला पाठिंबा देताय? थेट ‘मातोश्री’वरुन समज, कोकणात धूमशान
    फलटण तालुक्यात रणजितसिंह निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासकीय दहशत निर्माण केली असल्याचा आरोप रामराजे वारंवार करत होते. त्यांच्या चुकीच्या कामांना राज्यातील भाजप नेतृत्वाने पाठबळ देऊ नये, अशीही रामराजेंची मागणी होती. त्यामुळे महायुतीत असूनही रामराजे आणि निंबाळकर-गोरे यांच्यात संघर्ष पेटत राहिला. नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने रामराजेंनी वेगळाच पवित्र घेतला. थेट धनुष्यबाण चिन्हावरच त्यांनी पॅनल उभे केले आहे. काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना राष्ट्रवादीतच राहायचं की दुसऱ्या पक्षात जायचं ते मला कळतं. तेवढी माझी अजून बुद्धी चालते, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मुलाच्या प्रचार सभेत रामराजेंनी एकनाथ शिंदे यांच्या हातात हात घालून नेमका कोणता संदेश दिलाय? हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा