• Fri. Mar 6th, 2026

    अधिवेशनासाठी हातमागावरील पर्यावरणपूरक कापडांचे बुके – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Nov 28, 2025
    अधिवेशनासाठी हातमागावरील पर्यावरणपूरक कापडांचे बुके – महासंवाद




    नागपूर, दि.२८ : हातमागावर पारंपरिक कापडांच्या निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची ओळख आहे. प्रादेशिक वैशिष्ट्यांनुसार स्थानिक कलावंत या कापडाची निर्मिती करतात. विधिमंडळ अधिवेशनानिमित्त हातमाग महामंडळाने आकर्षक व पर्यावरणपूरक कापडाचे बुके तयार केला आहेत. कापडाचे बुके या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

    विविध समारंभामध्ये फुलांचा बुके देण्याची परंपरा आहे. त्याऐवजी कायम स्मरणात राहील आणि बुकेतील साहित्य दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरेल, अशा हातमागावरील विविध कापडांचा समावेश असलेले आणि तेवढेच आकर्षक कापडाचे बुके हातमाग महामंडळाने तयार केले आहेत. अधिवेशनासाठी येणाऱ्या अभ्यागतांच्या स्वागतासाठी हा बुके निश्चितच संस्मरणीय ठरणार आहे.

    नागपूर हे मध्य भारतातील हातमागाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. हातमागावरील विविध तयार कपड्यांना संपूर्ण देशात मागणी आहे. रेशीम साडयांपासून टॉवेल, चादर, रुमाल, सूती साडया आदी कापड हातमागावर स्वदेशी डिझाईनचा वापर करुन तयार करण्यात येते. यासाठी प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार तसेच फॅशनचा अभ्यास करुन कलात्मक व कौशल्याचा वापर करुन पर्यावरणपूरक वस्त्रांची निर्मिती केली जाते. शासनाने हातमाग उद्योगाचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रमाची आखणी केली आहे. येथील हातमागावरील वस्तूचे आकर्षण आहे. ही परंपरा पिढयानपिढया जपली जात असतानाच व्यवसायातील तंत्रज्ञानाचे जतन करताना आधुनिकतेची जोड मिळत असल्यामुळे हा समृध्द वारसा जतन होत आहे.

    हातमाग महामंडळातर्फे विणकरांना प्रोत्साहन देण्यासोबतच नवनिर्मित कापडांच्या निर्मितीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. हातमागावरील निर्मित कापडाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे बाजारपेठेसोबतच स्पर्धा करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. कापडी बुके ही संकल्पना उमरेड रोडवरील हातमाग महामंडळाच्या केंद्रात सुरु करण्यात आली असून, नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सहव्यवस्थापकीय संचालक गंगाधर गजभिये यांनी सांगितले.

    नागपुरी साडी, कोसा, सिल्क आदी दर्जेदार कापड हातमागावर तयार करण्यात आलेल्या बुकेसोबत आकर्षक कापडी बॅग तयार करण्यात आली आहे. कापडी बुकेमध्ये नॅपकीन, रुमाल, टॉवेल आदींचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच हस्तकलेद्वारे निर्मित केलेल्या बकेटमध्ये विविध प्रकारच्या हातमाग कापडांचा समावेश असलेले व तेवढयाच आकर्षक वेष्टनात कापडी बुके उपलब्ध आहेत. यासाठी हातमाग महामंडळाच्या अधिकृत केंद्रावरुन विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.

    ००००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed