• Tue. Mar 10th, 2026
    22 वर्षांच्या तरुणीने आयुष्य संपवलं; मित्राला पाठवलेल्या व्हॉईस नोटने धक्कादायक उलगडा

    Navi Mumbai Woman Ends Life: नवी मुंबईतील इलवे येथे एका 22 वर्षांच्या तरुणीने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. तिने शेजारीणच्या त्रासामुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, नवी मुंबई : उलवे सेक्टर 25A परिसरात 22 वर्षीय कुमकुम बलविंदर कौर या तरुणीने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात तिने जीव देण्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हॉईस नोटने तपासाला नवे वळण दिले आहे. कुमकुमने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या मित्र संदीप याला पाठवलेल्या ऑडिओमध्ये तिने आपल्या शेजारीण अंजली शर्मा (25) हिच्यामुळे ती मानसिकरीत्या त्रस्त झाल्याचा उल्लेख केला आहे.

    घटनेनंतर कुमकुमचे कुटुंबीय पंजाबहून नवी मुंबईत आले आणि त्यांनी उलवे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिचा भाऊ गौरव बलविंदर कुमार यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, अंजली शर्मा गेल्या काही महिन्यांपासून कुमकुमला सतत मानसिक त्रास देत होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अंजली शर्माला ताब्यात घेतले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राजणे यांनी दिली.
    Maharashtra TimesCrime News: आईला बॉयफ्रेंडसोबत नको त्या स्थितीत पाहिलं, ओढणी घेतली, दोघांनाही संपवलं; मग बॉडी गाडीत टाकली अन्…
    पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करताना राखाडी-पांढरा स्कार्फ जप्त केला आहे. हा स्कार्फ कुमकुमन जीव देण्यासाठी वापरला गेला असावा, असा प्राथमिक संशय असून तो फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे. यासोबतच कुमकुमचा मोबाईल फोन, कॉल डिटेल्स, संदेश, तसेच समाजमाध्यमावरील संभाषणांचेही विश्लेषण सुरू आहे.

    शेजारी रहिवाशांकडूनही पोलिसांनी जबाब नोंदवायला सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीवरून, कुमकुम आणि अंजली यांच्यात पूर्वीपासून काही वाद आणि तणावाचे प्रसंग घडल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर मानसिक छळाचा अँगल अधिक बळकट होत आहे.

    घटनेमागील नेमकं कारण, कुमकुमचे शेजारच्या व्यक्तींशी असलेले संबंध, तसेच तिने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध घेण्यासाठी तपास पथक चौकशी करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तपासात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

    या घटनेमुळे उलवे परिसरात महिला सुरक्षितता, मानसिक त्रास आणि शेजारी वाद यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. कुमकुमच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनीही या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने हाताळले असून, फॉरेन्सिक अहवाल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण सत्य लवकरच स्पष्ट होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा