Rajan Patil Mohol: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते राजन पाटील यांच्यावर जोरदार टीका केली असून यापुढे दमदाटीचे राजकारण चालणार नाही, असं ते म्हणाले. अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद ठरल्याने हा वाद सुरू झाला होता.
सोलापूरमधील वडाळा येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, “उज्ज्वला थिटे इथे बसल्या आहेत, त्यांच्याबाबतीत काय झालं, हे आपण सर्वांनी बघितलं. आपल्याकडे लोकशाही आहे. संविधान, कायदा हा सर्वांना सारखा आहे. सर्वांना निवडणुकीत उभं राहायचं अधिकार आहे. दमदाटी करून चालत नाही. प्रत्येकाचा फुगा फुटत असतो. मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढले जाते,” अशी टीका अजित पवार यांनी नाव न घेता राजन पाटील यांच्यावर केली.
पुढे बोलताना अजित पवार यांनी स्थानिक नेत्यांना चांगल्या विचारांच्या लोकांना संधी देण्याचे आवाहन केलं. ते म्हणाले की, “दमदाटी सुरू आहे, असं तुम्ही सर्वांनी म्हटलं, पण ज्या गावचं बोरी त्याचं गावचं बाभळी असतात. कोणी अरे केलं तर कारे करणारे पण लोक असतात. आमच्या लाडक्या बहिणी इथं आहे. उज्ज्वला थिटेही इथे आहेत. भाऊ म्हणून आम्ही कायम आमच्या बहिणीचं संरक्षण करण्याच काम केलं आहे. पुढच्या निवडणुकीत चांगल्या विचारांच्या लोकांना पुढे येऊ द्या. नव्याना संधी द्या व जुन्याचा अनुभवही घ्या,” असं आवाहन त्यांनी केलं.
शरद पवारांच्या नावाचा उल्लेख
अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवारांचा उल्लेख केला. “उज्वला ताई, आम्ही कायम महिलांचा सन्मान करणारे लोक आहोत. महिलांना संधी दिल्यास ते सोनं करतात आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जिथं महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आळं. पवारसाहेबांनी महिला आरक्षणाची सुरुवात केली आणि त्यात आम्ही भर घातली. म्हणूनच आम्ही लाडकी बहिणी योजना सुरू केली, ज्याची राज्यात सगळीकडे चर्चा झाली. महिला थोड्या प्रमाणात का असेना स्वयंपूर्ण झाल्या,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
