मुंबई महापालिका निवडणूक ही प्रचंड प्रतिष्ठेची असणार आहे. या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढण्याची शक्यता आहे. पण काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे. असं असलं तरी शरद पवार हे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. कारण विरोधकांची एकजूट झाली तर भाजपसह महायुतीला मुंबईत मोठं आव्हान असणार आहे.
काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांच्या शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जावून भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेत्यांनी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांना युतीचा प्रस्ताव दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षाची अनेक वर्षांपासूनची नैसर्गिक युती राहिलेली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुका एकत्र लढण्यासाठी आघाडीचा आपण प्रस्ताव दिल्याचं काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. तर शरद पवारांनी दोन दिवसांत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा करु, असं काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सांगितलं होतं. या सगळ्या घडामोडींनंतर आता सूत्रांकडून शरद पवार यांची भूमिका समोर येत आहे.
शरद पवार ठाकरे बंधूंबाबत सकारात्मक
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी राजकीयदृष्ट्या एकत्र येण्यावर शरद पवार यांची सकारात्मक भूमिका असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलं पाहिजे, अशी पवारांची भूमिका आहे. मतदार यादीमधील घोळा संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता, मग निवडणूक का वेगळी लढता? असा सवाल शरद पवारांनी केल्याचं सूत्रांची माहिती आहे. तसेच महाविकास आघाडीत मनसेला सामील करुन घेण्यासही शरद पवार सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुबईत मोठी दुर्घटना, भारतीय बनावटीचं तेजस विमान कोसळलं, काळजाचा थरकाप उडवणारा घटनेचा व्हिडीओ समोर
सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वांना सोबत घेऊन लढलं तर सर्वांना फायदा होईल. फाटाफूट झाली तर दोघांचं नुकसान होईल. विरोधकांची एकजूट फार महत्त्वाची आहे, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. तसचे उद्धव ठाकरे हे सध्या काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आता काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.
