Chhatrapati Sambhajinagar News : आशा चव्हाण यांनी मुलगा पवनला कॉल केला. दर्शन घेऊन आता मी रेल्वेने शहरात परत येत आहे, असं त्याला सांगितलं.
मध्य प्रदेश येथील कुबेरेश्वर धाम येथे वाळूज परिसरातील काही महिला दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन चांगले झाले, आता माघारी परतत आहोत, असं सर्वांनी घरी कॉल करून सांगितलं. याचवेळी आशा चव्हाण यांनी मुलगा पवनला कॉल केला. दर्शन घेऊन आता मी रेल्वेने शहरात परत येत आहे, असं आईने सांगितलं. पवनने आईला सांगितलं, तू शहरात पोहोचलीस की कॉल कर, मी तुला घ्यायला येतो.
पहाटे पाच वाजताच्या सुमारास सर्व महिला रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या. मात्र पहाटेच्या वेळी मुलाला कशाला उगाच त्रास द्या, असा विचार करुन कॉल करण्याऐवजी दोघी रिक्षा करुन वाळूजच्या दिशेने जात होत्या. पंचवटी हॉटेलजवळ एका ट्रॅव्हल्स बसची डिक्की उघडी राहिली होती. याचवेळी शेजारून रिक्षा जात असताना त्या डिक्कीचा पत्रा रिक्षात अडकला आणि रिक्षाला अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये आशा राजू चव्हाण आणि लता राजू परदेशी या दोघींचा जागीच मृत्यू झाला.
अपघातामध्ये आईचा मृत्यू झाल्याचं कळताच पवनने एकच टाहो फोडला. घाटी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांचे अश्रू अनावर झाले. या घटनेमुळे वाळूज परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आली . दरम्यान या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यामध्ये ट्रॅव्हल्स बस चालक आणि क्लिनर या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
