एकनाथ शिंदे यांनी आज अचानक दिल्लीत जावून अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“बिहारचं सरकार स्थापन होत आहे. बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीचं मलाही निमंत्रण आहे. त्यामुळे मी दिल्लीहून बिहारला निघणार आहे. म्हणून मी बिहारच्या यशाचं अभिनंदन करावं म्हणून गृहमंत्री अमित शाह यांना भेटलो. अतिशय चांगली चर्चा झाली. त्यांचं अभिनंदन केलं. बिहारमध्ये एनडीएला मोठा विजय मिळाला. त्यामुळे एनडीएचा घटकपक्ष म्हणून शिवसेनेलादेखील आनंद आहे. त्यामुळे जाता-जाता अमित शाह यांना भेटणं, त्यांचं अभिनंदन करणं आणि शुभेच्छा देणं हे झालं”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
‘मी रडणारा नाही तर लढणारा’
“मी तक्रारींचा पाढा वाचणारा, रडणारा एकनाथ शिंदे नाहीय. हा रडणारा नाही तर लढणारा एकनाथ शिंदे आहे. तुम्ही हे वेळोवेळी पाहिलं आहे. त्यामुळे यात छोट्यामोठ्या तक्रारी आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.
“नाराजी वगैरे हे सगळं तुमचा कल्पनाविलास आहे. हे सगळं तुम्ही पतंग उडवत असतात. मी आतमध्ये बसलो आहे आणि तुमच्या बाहेर बातम्या सुरु आहे. मी एवढंच सांगतो की, ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा विषय नसतो. त्यामुळे काल आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. त्यामधून एवढंच ठरलं की, महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, मतभेद होणार नाही, याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे. याबाबत प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाने सूचना दिल्या पाहिजेत”, असं मत शिंदे यांनी मांडलं.
“नाराजीचा विषय नव्हताच. तो विषय महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातळीवरचा आहे. स्थानिक पातळीवरचा होता. तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय नव्हता. तो विषय काल संपला आहे. त्या विषयाला मी एवढ्या गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही”, अशीदेखील प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
“बिहारमध्ये एनडीएमध्ये पाच पक्ष एकत्र होते. पाच पक्षांच्या एकजुटीमुळे प्रचंड मोठं यश एनडीएला मिळालं. बिहारच्या जनतेला पूर्वीचं जंगलराज नको होतं. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील विकास राज हवं होतं. मोदींच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली. त्यांच्यावर विश्वास ठेवला. नितीश कुमार यांनी पूर्वीचा काळ बदलला. त्यामुळे एकजुटीने लढतो तेव्हा यश नक्की येतो. महाराष्ट्रातही आपण एकजुटीची ताकद पाहिली”, असंही शिंदे म्हणाले.

