Ambernath municipal election: अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतही फूट पडली आहे. जागावाटपाच्या तिढ्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडली, तर महायुतीतील तिन्ही पक्षांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे इथली निवडणुक रंगतदार बनली आहे.
शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असे तीन पक्ष एकत्र आले असून अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षाकरिता अंजली राऊत यांना उमेदवारी दिली आहे. अंजली राऊत यांनी आज उमेदवारी दाखल केला आहे. दरम्यान मागील अनेक दिवसांपासून शहरात महाविकास आघाडी, मनसे आणि वंचित एकत्र लढणार असल्याची चर्चा होती. मात्र जागावाटपाचा तिढा काही सुटत नसल्याने अखेर काँग्रेस आणि वंचित महाविकास आघाडीतून बाहेर पडले आहेत.
Mumbai News: शाळेतल्या उपहारगृहामध्ये वडापाव खाल्ले; 15 विद्यार्थ्यांना विषबाधा, घाटकोपरमधील के.व्ही.के स्कूलमधील घटनेने खळबळ
रविवारी १६ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेत घेऊन मनसे, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. जागावाटपावर योग्य चर्चा झाली असून तिन्ही पक्ष कामाला लागले असल्याचे शिवसेना उबाठाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडरे यांनी जाहीर केले. तर काँग्रेसकडून नूतन प्रदिप पाटील यांना नगराध्यक्षाकरिता उमेदवारी दिली असून त्यांनी सुद्धा आज उमेदवार अर्ज भरला आहे.
मनसेचे उमेदवार मशाल चिन्हावर लढणार
मनसेचे 3 नगरसेवक यांनी मनसेला राम राम करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने अंबरनाथमध्ये मनसेला खिंडार पडले होते. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये डॅमेज कंट्रोल केले होते. मात्र नगरपरिषद निवडणूकीत मनसेने एबी फॉम दिलेचं नाही, अशी चर्चा सुरु झालीये. तर मनसेचे 14 उमेदवार आता मशाल चिन्हावर निवडणूक लढणार असून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. याबाबत मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी सांगितले की मनसेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून मनसेचे 14 उमेदवार हे मशाल चिन्हावर लढणार आहेत. नागरिकांमध्ये संभ्रम व्हायला नको म्हणून आम्ही मशाल चिन्हावर लढतोय. प्रत्येक पॅनलमध्ये आमचा एक उमेदवार आणि ठाकरे गटाचा एक उमेदवार असणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
अंबरनाथमध्ये पत्रकार मैदानात
अंबरनाथमध्ये यंदा शिंदेच्या शिवसेनेने प्रथमच एका पत्रकाराला उमेदवारी दिली आहे. पॅनल 17 मधून पत्रकार निनाद करमकर यांना संधी दिली असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहाराअध्यक्ष सदाशिव पाटील हे निवडणूक लढवणार आहेत.

