Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कमल तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे लोकार्पण झाले. ‘तीनशे वर्षांपूर्वी कमल तलाव तयार करण्यात आला, आता सगळेच कमळाकडे वळत आहेत. कितीही चिखल, दलदल असो, त्यात कमळ फुलते. चिखलात, दलदलीत फुलल्यावरही कमळ आपल्यावर एकही डाग येऊ देत नाही, अशी टिप्पणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.
चिकलठाणा विमानतळासमोर भाजपच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना मोठे यश मिळाले आहे. भाजपचा विजयरथ सातत्याने पुढे चालला आहे. मतचोरी, ईव्हीएमबाबत काँग्रेस व विरोधकांनी आरोप केले. पण, याबाबत ते न्यायालयात किंवा निवडणूक आयोगासमोर कुठलेही पुरावे देऊ शकले नाहीत. विरोधकांकडून पसरवण्यात येत असलेल्या ‘फेक नॅरेटिव्ह’ला जनताच उत्तर देत असल्याचं दिसत आहे. जोपर्यंत विरोधक जमिनीवरील वस्तुस्थिती आणि जनतेचे प्रश्न समजून घेणार नाहीत, तोपर्यंत त्यांचा असाच पराभव होत राहील.
बिहार निकालाने महाराष्ट्राची गणितं बदलली; वाटाघाटीला जागा नाही, घटक पक्षांच्या बार्गेनिंग पॉवरलाही ब्रेक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही विरोधकांची अशीच अवस्था होईल’, असे फडणवीस म्हणाले
‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीबाबत परवापर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावर सर्व निर्णय होत असतात. जागावाटप जिल्हास्तरावर होत असते. वरिष्ठ पातळीवर ते होत नाही. जिथे शक्य आहे तिथे युती होईल, काही ठिकाणी दोन पक्ष एकत्र येतील’, असे फडणवीस यांनी सांगितले. ‘पैशावर निवडणुका होतात, अशा आशयाचे विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले होते, याकडे पत्रकारांनी फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘त्यांचा रोख कुणाकडे आहे ते तुम्ही शोधा, त्यांचा रोख आमच्याकडे नाही.’‘मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. महायुतीचे सरकार अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. रब्बीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान दिले. तीन ते चार दिवसांत १०० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यांत पैसे पोहोचले’, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

