अलिबागच्या राजकारणाचा सध्या नवा चेहरा तयार झाला असून, नगरपरिषद निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तीनही पक्षांमध्ये होणाऱ्या या तिरंगी लढतीकडे संपूर्ण रायगडचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीत शेकाप हा प्रमुख घटक पक्ष असून, त्यांनी काँग्रेसला सोबत घेत मोट मजबूत केली आहे. काँग्रेसला दोन जागा दिल्या आहेत. मात्र या मोटेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याने अलिबागमध्ये उद्धवसेनेने स्वतंत्रपणे लढण्याची पूर्ण तयारी केली आहे. उद्धवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी कोण-कोण इच्छुक आहेत, हे येत्या २४ तासांत स्पष्ट होणार असल्याची माहिती मिळते.
शिवसेनेला महाविकास आघाडीतून बाहेर काढण्यात आल्याने आणि भाजपने तनुजा पेरेकरांचा प्रवेश करून त्यांना उमेदवारी दिल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. भाजपमध्ये अनेक निष्ठावंत कार्यकर्ते असताना बाहेरून आलेल्या नेत्या पेरेकरांना थेट उमेदवारी देण्यात आल्याने भाजपच्या स्थानिक पातळीवरील नाराजीला उधाण आल्याचे बोलले जात आहे. तरीही भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने पेरेकरांच्या जाहीर उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यामुळे त्यांना पाठबळ मिळेल, असे चित्र आहे.
दुसरीकडे शेकापकडून अक्षया नाईक यांच्या उमेदवारीमुळे तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन मिळाले आहे. प्रशांत नाईक यांच्या संघटनशक्तीमुळे शेकापचा गड भक्कम असल्याचे मानले जाते. शेकाप–काँग्रेस मोट मजबूत असल्याने त्यांचेही समीकरण तगडे दिसत आहे.
मात्र या दोन्ही पक्षांच्या संघर्षात उद्धवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यांच्याकडे चांगला मतदार वर्ग असल्याने स्वतंत्र लढत तिरंगी संघर्ष अधिक तीव्र करणार आहे. शेकापचा पारंपरिक प्रभाव, भाजपचा आक्रमक डाव आणि उद्धवसेनेची स्वतंत्र शक्ती या तीनही बाजूंमुळे अलिबागमध्ये निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच इतका अभूतपूर्व आणि रोमहर्षक सामना पाहायला मिळणार आहे.
एकूणच, तनुजा पेरेकर विरुद्ध अक्षया नाईक, आणि त्याचवेळी उद्धवसेनेचा स्वतंत्र लढा अशा त्रिकोणी लढाईमुळे अलिबागची निवडणूक चुरशीची आणि चर्चेची ठरणार यात शंका नाही.

