Mahavikas Aghadi News: महाराष्ट्राच्या निवडणुकीतून धडा न घेता काँग्रेसने बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्यास उशीर केला , असा हल्लाबोल ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे. जागावाटपातील काँग्रेसची भूमिका बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीतील सर्व जागांवरील कल हाती आले आहेत. बिहार विधानसभेच्या 243 जागांमध्ये आरजेडी-काँग्रेस आघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला तर एनडीए ऐतिहासिक बहुमत मिळवण्याकडे मार्गक्रमण करत आहे. सध्याची परिस्थिती पाहता एनडीए 207 तर महाआघाडी 29 जागांवर आघाडीवर आहे. या निकालानंतर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यात बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, “बिहार निवडणुकीचे निकाल पाहता काँग्रेससह महाआघाडीला मोठा फटका बसला आहे. काँग्रेसने महाराष्ट्रासह बिहारमध्ये मोठ्या चुका केल्या आहेत. या चुकांमधून काँग्रेसने शिकायला हवं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला असता तर वेगळं चित्र दिसलं असतं. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना चेहरा म्हणून घोषित करताना वेळ लावला, त्यामुळे नुकसान झालं. प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस जागावाटप करताना मोठा वाटा मागते. मात्र विजयाचे गणित आलं की त्यांचा मोठा पराभव होतो. यामुळे काँग्रेससोबत इतर पक्षांचं देखील नुकसान होतं. काँग्रेसने ही वृत्ती बदलली पाहिजे,” असा सल्ला देखील अंबादास दानवे यांनी दिला आहे.
दरम्यान, “महाराष्ट्र आणि बिहार निवडणुकीत वेगवेगळी परिस्थिती आहे. आम्ही महाविकास आघाडीसोबत राहण्यास इच्छुक आहोत. काँग्रेसने जागा वाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत येऊ नये. त्यामुळे निवडणुकीत उमेदवारांना कमी वेळ मिळतो. यातून नुकसान होत असतं,” असंही अंबादास दानवे म्हणाले.

