Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेला नोकरीचे आमिष दाखवून बँकेच्या अध्यक्षांनी तिच्या नावावर कार घेतली. पैशांवरून वाद झाल्यानंतर महिलेने नोकरी सोडली. परंतु, अध्यक्षांनी महिलेचा फोटो अनोळखी व्यक्तीसोबत जोडून सोशल मीडियावर बदनामी केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय संजना यांचा पतीसोबत वाद झाल्याने त्या पतीपासून विभक्त राहतात. संजना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी नोकरीच्या शोधात बाहेर पडल्या. यावेळी शिवराज जनसेवा अर्बन निधीचे अध्यक्ष शंकर अंबादास गोंडे याच्यासोबत ओळख झाली. गोंडे याने महिलेला दहा हजार रुपये पगाराने बँकेत नोकरी दिली. यातून महिलेची ओळख वाढवली. त्यानंतर महिलेच्या नावावर एम.एच. 20 जी.के. 3026 क्रमांकाची कार विकत घेतली. त्यानंतर पैशावरून पीडित संजना व गोंडे यांच्यामध्ये वाद झाला. या कारणाने संजना यांनी बँकेतली नोकरी सोडून दिली. मात्र तरीही आरोपी गोंडे याने महिलेला त्रास द्यायला सुरुवात केली.
अनोळखी व्यक्तीसोबत फोटो जोडून केली बदनामी
22 ऑक्टोबर रोजी शंकर गोंडे यांनी पीडित महिलेसोबतचा फोटो स्टेटसवर ठेवला. त्यानंतर बनावट इंस्टाग्राम अकाउंटवर पीडितेचा एका अनोळखी व्यक्तीच्या फोटो जोडून अपलोड केला. त्या फोटोखाली हा माझा तिसरा यार शेख अहमद कसा आहे, कमेंट करा, असा मजकूर लिहिला. एवढेच नाही तर पीडित महिलेला मी तुझी अशीच बदनामी करेन, तुला जगू देणार नाही अशी धमकी देखील दिली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराला कंटाळून पीडित महिलेने पुंडलिक नगर पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनंतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

