Pune News: पुण्यातील कोरेगाव पार्कातील 40 एकर सरकारी जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने अत्यंत कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप आहे. या व्यवहारात 25 कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ करत केवळ 500 रुपये भरले गेले. या प्रकरणी आता पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरणात अनियमितता आढळून आल्याने पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे समजते. तसंच याप्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
पार्थ पवार हे अमेडिया होल्डिंग्स एलएलपी या कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीत त्यांचे मामेभाऊ आणि आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे चुलत बंधू दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत. या दोघांनी मिळून ही सरकारी जमीन खरेदी केली आहे. सरकारी नियमांना बगल देऊन ही जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, 25 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली. केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार पूर्ण झाला. विशेष म्हणजे, जमीन खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे या व्यवहाराची फाईल इतक्या वेगाने कशी पुढे सरकली, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, पुण्यातील अतिउच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात ही 40 एकर सरकारी जमीन आहे. सर्व सरकारी नियम धाब्यावर बसवून ही जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप केला जात असून या प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.

