शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सत्याचा मोर्चा’मध्ये भाजपवर जोरदार टीका केली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घरी येऊन माझ्या नावाने अर्ज केल्याचा किस्सा सांगत, त्यांनी मतदारांच्या यादीतून नावे वगळण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. मतचोरीचे प्रयत्न हाणून पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाविकास आघाडी आणि मनसे यांच्याकडून आयोजित सत्याचा मोर्चात उद्धव ठाकरेंनी भाषण केलं. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला. ‘काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे अधिकारी घरी आले होते. तुम्ही अर्ज केला आहे. त्यासंदर्भात पडताळणी करण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी माझ्याशी चर्चा केली. मग अर्जावर, सदर अर्जाबाबत अर्जदार यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळालेला आहे. त्याआधारे सदर अर्ज बाद करण्यात आलेला आहे, असा शेरा दिला,’ असा किस्सा उद्धव यांनी कथन केला.
निवडणूक आयोगाकडे अर्ज करणाऱ्याचं नाव होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. त्यानंतर मंचावर, कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला. ‘माझ्या नावानं कोणीतरी अर्ज केला होता. माझ्यासह माझ्या कुटुंबातील सदस्यांची नावं मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार गंभीर आहे. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी अर्ज सक्षम नावाच्या ऍपवरुन अर्ज करण्यात आला होता. माझ्या नावानं खोट्या नंबरवरुन ओटीपी काढण्याता प्रयत्न झाला. या संदर्भात मी रितसर तक्रार दाखल केलेली आहे,’ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मतदार यादीतील घोळांचे, दुबार मतदारांचे सगळे पुरावे घेऊन आम्ही कोर्टात जाणार आहोत. त्यांच्याकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयुक्त लाचार असल्यानं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी तर गेल्या ३ वर्षांपासून सुरु आहे. पण अद्याप त्यावर निकाल लागलेला नाही, अशी खंत उद्धव यांनी व्यक्त केली. ‘शिवसेना, मनसे , काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षांचे कार्यकर्ते मतचोरीचे प्रयत्न हाणून पाडतील. पण मतदारांनीदेखील जागरुक राहावं,’ असं आवाहन उद्धव यांनी केलं.

