राज ठाकरे यांनी येत्या 1 नोव्हेंबरला काढण्यात येणाऱ्या मोर्चात नागरिकांना मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचं आवाहन केलं. हा मोर्चा मुंबईत फॅशन स्ट्रिटपासून सुरु होईल आणि मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या समोर येऊन धडकणार असल्याची माहिती आहे.
“हे जे चाललं आहे महाराष्ट्रातील देशातील प्रामाणिक मतदाराचा अपमान सुरु आहे. मतदार उन्हातान्हात रांगेत उभा राहतो. त्याच्या मताचा तो अपमान आहे. हे सर्व सुधारलं पाहिजे. हे सगळं नीट झालं पाहिजे. देशातील निवडणुका पारदर्शकपणे झाल्या पाहिजेत. या मशीन तर जगात कुठेच नाहीत. सर्व पुढारलेल्या देशात आजही बॅलेट पेपरवर मतदान होतात. तीन-चार देशात वोटींग मशीन वापरलं जातं. तेही कुठे तर आफ्रिकेत. पण सगळ्या देशांत बॅलेट पेपर वापरला जातो. हे मी नाही बोललो. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. त्यांचाही एक व्हिडीओ माझ्याकडे आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.
“मुंबईचा मोर्चा झाल्यानंतर घराघरात जा. तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत. आमच्या गजानन काळेने काल एक गोष्ट शोधून काढली. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्यावर 550 मतदारांची नोंदणी आहे. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्यावर? एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा? बसला असताना सही घेतली काय?”, असे मिश्किल सवाल राज ठाकरेंनी केले.
“काहीही सुरु आहे. मला असं वाटतं हा पोरखेळ नाही. हा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यातील पाच-पाच वर्षे जात आहेत. येत्या एक तारखेला आपण दणदणीत संख्येने हजर राहाल अशी अपेक्षा करतो. तिकडे बसेस जाऊ शकतात का ते माहिती नाही. त्यामुळे मी स्वत: मोर्चाला लोकलने जाणार आहे”, अशी घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली.
‘…म्हणून आपला पराभव’
“लोकं आपल्याला मतदान करत आहेत. पण या सगळ्या भानगडीतून दरवेळी पराभव पत्करावा लागतो. अनेकांना वाटत असेल की मी कारणं देतोय. पण कारण काय द्यायची? संपूर्ण देश बोंबलत आहे. या सगळ्या प्रक्रियेतून सत्तेत यायचं आणि सत्ता हवी तशी राबवायची. आपण काय सांगत आहोत? मतदार याद्या स्वच्छ करा. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाच वर्षे निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे मतदार याद्या स्वच्छ करा”, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
‘शिवरायांच्या किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभं केलं तर फोडून टाकणार’, राज ठाकरेंचा मोठा इशारा
“अजून एक वर्ष लागला तरी चालेल. एक वर्षात निवडणुका घ्या. काय फरक पडतो? उद्या मतदारयाद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला ज्याचा विजय आणि पराभव होईल तो आम्हाला मान्य आहे. मतदार याद्या स्वच्छ झाल्यावर आज जे सत्तेवर आहेत त्यांचा विजय झाला तर आम्हाला मान्य आहे. पण या सगळ्या गोष्टी लपवायच्या आणि त्यातून निवडणुका घ्यायच्या, मॅच तर फिक्स आहे. ज्यावेळेला क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग झालं त्यावेळेला सर्वांना बाहेर काढलं होतं. इथे कुणालाच काढत नाहीत”, असं राज ठाकरे रोखठोकपणे म्हणाले.

