Nagpur Farmer News: नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांचे अभूतपूर्व आंदोलन सुरू असून ‘महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा’मुळे महामार्ग ठप्प झाले होते. वाहतूक कोंडी आणि गैरसोयीनंतर, नागपूर खंडपीठाने मार्ग मोकळा करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी मुंबईत बोलावलं असून बच्चू कडू थोड्याच वेळात मुंबईला रवाना होणार आहेत.
‘महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा’मुळे नागपूर-हैदराबाद व नागपूर-जबलपूर महामार्गांवरील वाहतूक बुधवारी सायंकाळपासून पूर्णपणे थांबली होती. नागरिकांना शहरात येण्यासाठी पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागला. या आंदोलनामुळे नागपूरकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अशातच आंदोलक स्वतःला अटक करून घेण्यासाठी पुढे सरसावल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
राज्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याची आणि चर्चेतून मार्ग काढण्याची विनंती केली. या चर्चेत राजू शेट्टी, डॉ. अजित नवले, वामनराव चटप, खा. अमर काळे, महादेव जानकर, रवी तुपकर यांसारखे शेतकरी नेते सहभागी झाले होते. आंदोलकांना भीती होती की चर्चेसाठी गेल्यास त्यांचं आंदोलन दडपलं जाईल. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणावी, अशी मागणी केली.
Weather Forecast: राज्यात पुन्हा कोसळधार! मुंबई, पुण्यासह 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट, असा आहे IMDचा ताजा अंदाज
सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी आणि महसूलमंत्र्यांशी आंदोलकांची फोनवरून चर्चा घडवून आणली. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना आज चर्चेसाठी मुंबईत बोलावलं असून बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडून ‘आम्ही चर्चेसाठी मुंबईला गेलो तरी नागपुरातील आंदोलन दडपलं जाणार नाही’ असा शब्द घेतला. पंकज भोयर यांनी शांततामय मार्गाने आंदोलन केल्यास आंदोलकांना त्रास दिला जाणार नाही, असं आश्वासन दिलं आहे.
दरम्यान, सरकारच्या चर्चेनंतर बच्चू कडू यांनी आंदोलकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘आपली एक मागणी नाही, तर 25 मागण्या आहेत. त्यासाठी मुंबईला जाणं गरजेचं आहे. चर्चेतून प्रश्न सुटतात. आपण चर्चेला गेलो म्हणजे आपले आंदोलन संपलं असं नाही. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली नाही, तर सुरू असलेले हे आंदोलन अधिक आक्रमक करू. 31 तारखेला रेल्वेच्या रुळावर जाऊन बसू’, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

