परभणीत एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडल्याचं समोर आलं आहे. या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या शेतकऱ्याने पत्रकारांना प्रतिक्रिया दिली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धनाजी चव्हाण, परभणी : अतिवृष्टीनंतर राज्य सरकारने 31 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आणि प्रत्येक शेतकऱ्याला दिवाळीपूर्वी 18 हजार 500 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे आश्वासन देखील दिले. पण दिवाळी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार, पाच हजार, सहा हजार आणि सात हजार रुपये असे अनुदान जमा होऊ लागले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे. याच दरम्यान परभणी येथील चिडलेल्या एका शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर प्रचंड दगडफेक केली आणि त्यांची गाडी फोडली.
शेतकऱ्यांना फसवे आश्वासन दिले. शेतकऱ्यांना कर्जमाफी करत नसल्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्याने गाडी फोडली असल्याचे सांगितले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर माझा जीव जरी या सरकारने घेतला तरी मी द्यायला तयार असल्याचेही तो म्हणाला.
संतोष रावण पैके (राहणार साठोरी तालुका पालम जिल्हा परभणी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या शेतकऱ्याला प्रचंड मारहाण करण्यात आली. मारहाण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पत्रकारांना सबंध प्रकार सांगितला. “एकीकडे राज्यांमध्ये संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी आंदोलन चालू आहेत. पण दुसरीकडे मात्र राज्य सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. अतिवृष्टीमुळे खरिपाचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. रब्बीची पेरणी कशी करावी? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. डोक्यावर कर्जाचा ओझं आहे. अशा परिस्थितीत सरकार केवळ शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देत आहे”, अशी टीका शेतकऱ्याने केली.
“मी कोणत्याच पक्षाचा नाही. मी भाजपला मतदान केलं आहे. मी काँग्रेसला मतदान केलं आहे. माझा आणि पक्षाचा काहीही संबंध नाही. मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय मला सहन झाला नाही. बच्चू कडू हे नागपूर येथे प्रचंड मोठे आंदोलन करत आहेत. पण सरकार त्यांची दखल घेताना दिसत नाही. जिल्हा प्रशासन देखील याबाबतीत बेजबाबदारपणाने वागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच मला राग सहन झाला नाही म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली. ही जिल्हाधिकाऱ्यांची गाडी म्हणून फोडली नाही तर मी सरकारची आणि मंत्र्याची गाडी म्हणून फोडली आहे”, असेही या शेतकऱ्याने सांगितले. सुषमा अंधारे यांनी थेट पुरावे दाखवले, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात स्फोटक पत्रकार परिषद संतोष पैके एवढ्यावर थांबले नाहीत तर ते म्हणाले की, मला या सरकारने गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी यापुढे आणखीन तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण एकंदरीतच थेट जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडून या शेतकऱ्याने शेतकऱ्यांचा आक्रोश राज्य सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पाहावे, असेच आता सर्वत्र चर्चिले जात आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा