राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात एका महिला कार्यकर्त्याने लावणी सादर केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही सदस्य झालेले असल्यामुळे, या परिवाराचे घटक झालेले असल्यामुळे आपण आपल्याकडून कुठली चूक होऊ देऊ नका. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नका. संविधानाचा आदर करा. आपण विकासाच्या कामांवर एकमेकाला सहकार्य करत राहू. कुठेही सर्वसामान्यांवर अन्याय होत असेल तर तो दूर करण्याकरता आपण एकमेकांना साथ देऊ”, असं अजित पवार म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
नागपुरात दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने, राष्ट्रवादीच्या नव्या कोऱ्या कार्यालयात छोटेखानी कार्यक्रम झाला. त्यात काही लोकांचे सत्कार झाले. त्याच वेळी एका नृत्यांगणेने लावणी सादर केली. पदाधिकाऱ्यांनी टाळ्या, शिट्या वाजविल्या. तो व्हिडीओ वायुवेगाने राज्यभर व्हायरल झाला. राज्यात अतिवृष्टी झाली असताना, शेतकरी संकटात असताना सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयात लावणीचे ठुमके लावणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्याची गंभीर दखल घेत, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावत, लेखी उत्तर मागितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बॅकफुटवर गेले. त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांना समोर करून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.महिला शहराध्यक्षा सुनीता येरणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. “पक्ष कार्यालयातील दिवाळी मिलनाचा कार्यक्रम हा पक्षाचा घरघुती कार्यक्रम होता. तेथे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबतच सामाजिक स्तरावर कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला. सगळीकडे खेळीमेळीचे वातावरण होते. तेव्हा पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी अंगभूत कला सादर करण्याची विनंती केली. कार्यकर्ती नृत्यांगणा शिल्पा शाहीर यांनीही आपली लावणी सादर करण्याची इच्छा बोलून दाखविली”, असं सुनीता येरणे म्हणाल्या.
“लावणी ही महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे. त्या कलेचा सर्वांनी नेहमीच आदर बाळगायला पाहिजे. एक महिला तो कलाप्रकार सादर करते तेव्हा तिचाही सन्मान करायला हवा. मात्र त्या क्लिपमधून फक्त पक्षाचेच नाव बदनाम होत नसून त्या महिलेचाही अपमान केला जात आहे. लावणी हा प्रकार सादर करणे हे चुकीचे नाही. मात्र ज्या जागी हा प्रकार घडला, तिथे म्हणजे पक्षकार्यालयात तो घडायला नको होता. त्याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. असा प्रकार यापुढे पुन्हा घडणार नाही”, अशी ग्वाही सुनीता येरणे यांनी दिली.
सुषमा अंधारे यांनी थेट पुरावे दाखवले, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात स्फोटक पत्रकार परिषद
संशयाची सूई नेत्यावर
लावणीचा व्हिडीओ पक्षाच्याच कुणी तरी व्हायरल केल्याचा संशय यावेळी व्यक्त केला गेला, त्याचे नाव चार-आठ दिवसात उघड करण्याचा इशाराही दिला. ‘हा प्रकार निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला. तो करणारी व्यक्ती पक्षातील असो अथवा बाहेरची, वरिष्ठ त्यांच्यावर लवकरच कारवाई करतील’, असेही येरणे म्हणाल्या.

