रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मोकळा वेळ घेऊन अनेक जण मुंबईलगत असणाऱ्या गावांमध्ये फॉर्म हाऊस असलेल्या ठिकाणी फिरायला जातात. असंच एक कुटुंब पनवेल तालुक्यातील गावात गेलं होतं. पण तिथे या कुटुंबाच्या निदर्शनास एक वेगळाच प्रकार आला.
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असणाऱ्या धानसर गावात असणाऱ्या एका खासगी फार्म हाऊस येथे काही दिवस रोजच्या कामाच्या धकाधकीतून काही दिवस काढून विश्रांतीसाठी कुंटुंबासाहित महिला ही आली होती. सदर फार्म हाऊस हे मूळ मालकाने काही काळासाठी मनोज चौधरी (वय 35, रा. रांजनपाडा, खारघर) याच्याकडे भाडे तत्वावर सोपविले होते. शनिवार, 25 ऑक्टोबर रोजी मुंब्रा येथील एक कुटुंब काही दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी येथे आले होते.
सर्व काही मौज मजेत सुरू असतानाच, रविवारी सकाळी त्या कुटुंबातील एका तरुणाला स्वच्छतागृहातील बल्बच्या होल्डरविषयी संशय आला. त्याने तपास केला असता होल्डरमध्ये लपवलेला एक छोटा कॅमेरा सापडला. कॅमेऱ्यातील फुटेज तपासून पाहिल्यावर महिलांच्या आंघोळीचे दृश्य रेकॉर्ड झाल्याचे उघड झाले. संतापलेल्या कुटुंबीयांनी त्वरित तळोजा पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून आरोपीला अटक केली. तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक सागर निकम यांच्याकडे देण्यात आली आहे. विश्रांतीसाठी फार्महाऊसवर आलेल्या महिलांच्या खासगी क्षणांचे गुप्त चित्रीकरण करण्यासाठी रिसॉर्टचालकाने स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा बसविल्याचा प्रकार उघड झाला आहे.
अजित पवार यांची राष्ट्रवादी पक्ष कार्यालयातील लावणीच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया, म्हणाले…
या प्रकरणात तळोजा पोलिसांनी मनोज चौधरी (वय 35, रा. रांजनपाडा, खारघर) याला अटक केली आहे. असल्याची माहिती तळोजा पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपीने महिलांच्या गोपनीयतेचा घोर भंग केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. परिसरातील महिलांनीही फार्महाऊस, रिसॉर्ट किंवा सार्वजनिक ठिकाणी वापरताना अधिक सजग राहण्याचे आवाहन तळोजा पोलिसांनी केले आहे.

