Satara Doctor Postmortem Report: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूने खळबळ उडाली असून आत्महत्येपूर्वी तिने बलात्काराचा आरोप केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, फलटणमधील हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर रुग्णालयात तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. याबाबतचा अहवाल आता रुग्णालयाकडून पोलिसांना सोपवण्यात आला आहे. यामधून तरुणीचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचं स्पष्ट झाल्याचे समजते. तसंच तरुणीच्या शरीरावर कसल्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे डॉक्टर तरुणीला होत असलेल्या त्रासातून तिने आपले जीवन संपवल्याचं या रिपोर्टमध्ये आढळलं आहे.
तरुणीच्या मृत्यूवरून कोणता आरोप?
“फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या नसून, संस्थात्मक हत्या आहे, असा आमचा दाट संशय आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या दबावातून हा प्रकार घडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकर यांमना क्लीन चिट देण्याची घाई करू नये. क्लीन चिट म्हणजे पोलिसांनी तपास थांबवण्याचे अलिखित संकेत आहेत,’ असा गंभीर आरोप शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काल पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी चौकशीसाठी उच्च न्यायालयाने समिती स्थापन करण्याची मागणीही सुषमा अंधारे यांनी केली आहे.
दरम्यान, ‘बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार रणजीतसिंह नाईक निंबाळकर त्यांच्या साखर कारखान्यासाठी आणत होते. कामगार कारखाना सोडून जाऊ नयेत यासाठी कामगारांच्या तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र देण्यासाठी महिला डॉक्टरवर दबाव टाकला जात असे. यासंदर्भात संबंधित डॉक्टर तरुणीने वरिष्ठांनाही पत्र दिले होते,’ असा आरोप करण्यात आला आहे.

