Pune Crime News: पुण्यात म्हाडाच्या वरिष्ठ लिपिकाने आत्महत्या केली असून आत्महत्येपूर्वी त्याने बहिणीला व्हिडिओ कॉल करून ‘आता मी जातो आहे, पण यांना सोडू नको ताई’ असं म्हटलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नातेवाईकांनी पत्नी व मुलींवर गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या आधी पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला होता. घरातून बाहेर पडताना पत्नीला त्याने म्हटलं की, “आता तुला विधवा करतो” आणि त्यानंतर त्याने गळफास घेतला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ माजली असून नातेवाईक संतप्त झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
नितीन साळवे हे मुंबई येथील म्हाडा कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. ते फक्त शनिवार आणि रविवारी पुण्यात राहत असत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
नितीन साळवे यांच्या आत्महत्येबाबत त्यांच्या बहीण पूनम उमेश कांबळे यांनी नितीनच्या पत्नी आणि मुलींवर गंभीर आरोप केले आहेत. पूनम यांनी सांगितले की, “नितीनला त्याची पत्नी आणि दोन मुली सतत त्रास देत होत्या. घरात रोज भांडणं होत असत. नितीनची पत्नी बाहेर अनैतिक संबंध ठेवत होती. आत्महत्येच्या दिवशी मोठ्या मुलीने नितीनच्या छातीवर लाथ मारली आणि पत्नी तसेच दोन मुलींनीही अपमानास्पद वर्तन केले. त्यामुळेच नितीनने मला शेवटचा व्हिडिओ कॉल करून आत्महत्या केली,” असा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत मृत नितीन साळवे यांच्या पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

