Nanded Crime: नांदेड जिल्ह्याती तरुणाची प्रेमप्रकरणातून निर्घृण हत्या झाली. कर्नाटकातील एका विवाहित महिलेसोबत असलेल्या संबंधांमुळे हा प्रकार घडला असून महिलेच्या नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. त्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोणेगाव येथील विष्णूकांत पांचाळ (वय वर्ष 21) या नांदेडमधील तरुणाचे कर्नाटकातील नागमप्पली येथील एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांबद्दल माहिती मिळाल्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी सदर महिलेच्या नातेवाईकांनी विष्णूकांतला नागमप्पली येथे बोलावले होते. तिथं पोहोचल्यानंतर आरोपी गजानन व अशोक यांनी त्यांच्या काही साथीदारांसोबत मिळून विष्णूकांतचे हात-पाय बांधले. तसंच नंतर विष्णुकांतवर अमानुष अत्याचार करत निर्दयीपणे बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्याच्या शरीरावर गरम चटके देऊन छळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या बेदम मारहाणीत विष्णूकांत गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी हैदराबाद येथे नेण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच 22 ऑक्टोबरच्या सायंकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने तपास सुरू केला असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रेमप्रकरण मृत्यूपर्यंत घेऊन गेले…
विष्णूकांत पांचाळ हा गोणेगाव येथील रहिवासी होता. त्याचे प्रेमसंबंध कर्नाटकातील नागमप्पली (ता. औराद, जि. बिदर) येथील एका विवाहित महिलेसोबत होते. या प्रेमसंबंधांमुळेच त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. एका प्रेमसंबंधाचे रूपांतर इतक्या क्रूर हत्याकांडात झाल्याने भीतीचं वातावरण निमाण झालं असून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कंबर कसली आहे.

