Satara Crime : सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
महिला डॉक्टरचे आतेभाऊ म्हणाले की, ‘फक्त खासदार इतकाच उल्लेख आहे. नाव कोणाचेही नाही खासदारांच्या पीएने खासदारांना फोन लावून दिला आणि त्यानंतर बहीण त्यांच्याशी बोलली होती. हे खासदार फलटण भागातील आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता. याबाबत बहिणीशी चर्चा झालेली नाही. बहिणीची दुसरी चुलत बहीण मेडिकल ऑफिसर आहे तिला काही दिवसांपूर्वी तिने दबाव येत असल्याबाबत सांगितलं होतं. त्यानंतर आत्महत्या केल्यानंतरच आम्हाला समजलं. बहिणीने दोन-तीन महिन्याआधी तक्रार देऊन देखील त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही’, असा आरोप त्यांनी केलाय.
मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीस-मनोज जरांगे पाटील दिसणार एका मंचावर, मराठा आरक्षणानंतर पहिल्यांदा एकत्र येण्यामागचं कारणही आहे खास….
महिला आयोगाने काय माहिती दिली?
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर ने पोलिस निरीक्षक गोपाल बदने याने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाइड नोटमुळे समोर आले आहे. तसेच प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. सद्यस्थितीत याप्रकरणी फलटण सिटी पोलीसमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (2) (N), 108 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यासाठी शोधपथक रवाना करण्यात आले आहे. मयत डॉक्टर यांचे शव विच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. फरार आरोपींचा तातडीने शोध घेऊन संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा असे निर्देश आयोगाने पोलीस अधीक्षक, सातारा यांना दिले आहेत. पीडित महिलेने याआधी त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली असल्यास त्यांना मदत का मिळाली नाही याचीही चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत.

